सीमावासीयांचा संताप, कानडी आमच्या उरावर बसून आमच्या भाषेला नाकारताहेत!
साहित्यनगरीत आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमावासीयांचा बुलंद आवाज घुमला. सीमावासीयांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी संमेलनस्थळी घोषणाबाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘बेळगाव, कारवार, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र मैं, नही तो जेल मैं,’ ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशी जोरदार नारेबाजी केली.
मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सात दशकांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्षवेधण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली खानापूर आणि बेळगाव येथील सीमाबांधव दिल्लीला दाखल झाले आहेत. त्यांनी आज संमेलनस्थळी आवाज उठवला. ‘मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाला म्हणून गुलाल उधळून नाचणाऱयांनो आमच्या उरावर उभे राहून हे कन्नडीग आमच्या भाषेला धुडकारत आहेत. ज्या दिवशी, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र होईल तोच खरा महाराष्ट्र!,’ अशा भावना सीमावासीयांनी व्यक्त केल्या. सीमाप्रश्न खटला अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पटवून दिलं पाहिजे की सीमावासीयांवर कसा अन्याय होतोय. देशाच्या राजधानीच्या ठिकाणी होणाऱया साहित्य संमेलनात केंद्र शासनाने बेळगाव सीमाभाग तात्काळ महाराष्ट्रात सामील करावा, असा ठराव मांडून सीमा भागातील मराठी भाषिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटून निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List