प्रवासी का भडकतात? लोकलमध्ये श्वास घ्यायलाही जागा नाही, चाकरमानी रोज रडे, रोज ‘मरे’
>> नरेश जाधव
चाकरमान्यांनी खचाखच भरलेल्या कल्याण दादर लोकलमध्ये एका तरुणाने केवळ उतरायला मिळत नसल्याच्या कारणावरून तीन प्रवाशांवर अंदाधुंद चाकू हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली. वरवर ही घटना क्षुल्लक वाटत असली तरी या घटनेने मुंबईकरांची लाइफलाइन सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या, तुलनेने मर्यादित फेऱ्या, एसी लोकलमुळे कमी झालेल्या नियमित फेऱ्या, विस्तारीकरणाची रखडलेली कामे प्रवाशांच्या मुळावर उठत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या घिसाड कारभारामुळे कर्जत, कसारा मार्गावरील लाखो चाकरमान्यांना रोजच मरणयातना भोगाव्या लागत आहेत. प्रवाशांना श्वास घ्यायलाही जागा नसल्याने त्यांच्या संतापाचा भडका उडत आहे.
गेल्या दहा-बारा वर्षांत प्रवाशांची संख्या वाढून एकही कसारा लोकल वाढवलेली नाही. लोकलला गर्दी असल्याने अनेक प्रवाशांना दरवाजाला लटकून प्रवास करावा लागतो. कल्याण-कसारा मार्गावर जानेवारी 2025 ते आजपर्यंत 27 अपघात झाले असून यामध्ये 17 प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडे काहीच उपाययोजना नाहीत. टिटवाळा ते कसारा स्थानकाजवळ होत असलेल्या वाहतूककोंडीवर अजूनही रेल्वेला उत्तर शोधता आलेले नाही. प्रवासी रोज मरणयातना सहन करत आहेत. कसारा स्थानकातून सकाळी नऊच्या दरम्यान मुंबई लोकलची संख्या वाढवण्याची गरज आहे. तसेच या वेळेत मुंबईकडे जाणाऱ्या मेल एक्स्प्रेस कसारा स्थानकात थांबवल्यास प्रवाशांची मोठी सोय होईल. मात्र यावर रेल्वेचे अधिकारी साधा विचारही का करत नाहीत असा संताप प्रवाशांचा आहे.
मदमस्त प्रशासनाचे गावखाती नमुने
1 कल्याण – कसारा रेल्वे मार्गावर नेमक्या पीक अव्हरला एखाद्या स्थानकात अचानक लोकल थांबवून मेल एक्स्प्रेस पुढे काढल्या जातात. कधी दहा मिनिटे तर कधी अर्धा तास लोकल सायडिंगला उभ्या केल्या जातात. प्रवाशांना रोजच हा मनस्ताप आहे. संताप व्यक्त करण्यापलीकडे प्रवासी काहीच करू शकत नाहीत. लाखो रुपये पगार घेऊन एसीमध्ये खुर्च्य उबवणाऱ्या अधिकाऱ्यांना अजूनही लोकल आणि मेल – एक्स्प्रेसचे विनाअडथळा वेळापत्रक आखता आलेले नाही.
2 इंजिन बिघाड, रूळ तुटणे, गाड्या रुळावरून घसरणे, सिग्नलमध्ये बिघाडासारख्या तांत्रिक समस्या 12 महिने असतात. यापैकी कोणतीही एक समस्या रोजच प्रवाशांच्या पाचवीला पुजलेली असते. ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासन कधीच मेहरबान होत नाही. एक तर स्थानकात गाडीची वाट पाहात ताटकळत उभे राहावे लागते किंवा दोन्ही स्थानकांच्या मध्येच लोकल खोळंबल्याने प्रवाशांचा जीव घुसमटतो. परिणामी कामावर रोजच लेटमार्क लागतो.
3 उपनगरीय रेल्वे प्रवास म्हणजे जीवघेणा प्रवास. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी अक्षरशः मरणयातना प्रवाशांना सहन कराव्या लागतात. यावर उपाय म्हणून मेल एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्ग असावा यासाठी कल्याण कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात आले. पण हे काम फारच संथ गतीने सुरू असल्याने हा तिसरा मार्ग कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे मेल एक्स्प्रेस व लोकल ट्रेन एकाच मार्गावरून ये जा करीत असल्याने लोकल रोजच लेट होतात
कल्याण ते कसारा रेल्वे
प्रवासादरम्यान उशिरा धावणाऱ्या लोकल, तिसरा रेल्वे मार्ग व रोज येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी नुकतीच रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली आहे. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. – सुरेश म्हात्रे, खासदार
तिसऱ्या मार्गाचे काम
लवकरात लवकर पूर्ण केल्यास उपनगरीय लोकल सेवेला अडथळा येणार नाही. यासाठी रेल्वेने लक्ष देणे गरजेचे आहे. रोजच्या लेटलतीफ लोकलमुळे प्रवासी हैराण आहेत. – राजेश घनघाव, प्रवासी संघटना अध्यक्ष.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List