तुतारी वाजवून नरेंद्र राणे परतीच्या वाटेवर, हातावर बांधणार घड्याळ, अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केव्हा?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नरेंद्र राणे परतीच्या वाटेवर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत थोरल्या पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. पण तिथे काही त्यांचे मन रमलं नसल्याचे समोर येत आहे. ते परत अजितदादांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आता दादांच्या पक्षात त्यांना कधी प्रवेश मिळतो, याची चर्चा सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ही दंगल होत आहे. या काळात अनेक उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
सुनील तटकरे यांची घेतली भेट
नरेंद्र राणे त्यांचे भाऊ आणि दिनकर तावडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भेटीला प्रदेश कार्यालयात पोहोचले आहेत. निवडणुकीपूर्वी मुंबई कार्याध्यक्ष पदी असणारे नरेंद्र राणे, जनरल सेक्रेटरी पदी असणारे विलास माने यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता निवडणूक संपताच पुन्हा राणे आणि त्यांचे समर्थक पदाधिकार्यांना परतीचे वेध लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
कधी होणार प्रवेश?
नरेंद्र राणे हे सुनील तटकरे यांच्या भेटीला आल्यानंतर एकच चर्चा होत आहे. त्यांचा पक्ष प्रवेश कधी होईल याविषयी चर्चा होत आहे. अर्थात राष्ट्रवादी आणि नरेंद्र राणे यांच्याकडून याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या नरेंद्र राणे आणि त्यांच्या ४ सहकाऱ्यांना पक्षातून विरोध असल्यामुळे पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभेपूर्वी केली होती बंडखोरी
नरेंद्र राणे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत बंडखोरी केली होती. त्यांनी सहकाऱ्यांसह शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या बंडखोरीने अजित पवार गटाला फटका बसेल असे संकेत होते. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला बळ मिळेल असे मानले जात होते. त्यावेळी सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले होते. आता त्यातील अनेक जण स्वगृही परतण्याच्या तयारीत आहे. महायुतीला मोठे यश मिळाल्याने अनेकांना आता परतीचे वेध लागले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List