न्यू इंडिया बँकेचे ठेवीदार जागोजागी सरकारला घेरणार, भाजप, आरबीआयकडून लपवाछपवी… गोलमाल…
न्यू इंडिया बँकेतील कोट्य़वधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे सर्वसामान्य कष्टकरी, कामगार हवालदिल झाले आहेत. मात्र भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार दाबण्यासाठी सरकार व आरबीआय लपवाछपवी करीत आहे. ग्राहकांचे अडकलेले पैसे कधी देणार याबाबत स्पष्टीकरण दिले जात नसल्याने ठेवीदार संतप्त झाले आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे व सुरतमध्ये जागोजागी चौकसभा घेऊन ठेवीदार सरकारविरुद्ध हल्लाबोल करणार आहेत. यासोबतच न्यायालयीन लढ्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
कष्टकरी कामगारांच्या आयुष्यात मोठा आधार देणारी न्यू इंडिया सहकारी बँक भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे बुडाली. त्या घोटाळेबाज नेत्यांवर कारवाई करण्याआधी आरबीआयने बँकेच्या सर्व व्यवहारांवर निर्बंध लादले. यात सामान्य लोकांचे कष्टाचे पैसे अडकले. या पैशांची कुठलीही हमी दिली जात नसून घोटाळेखोरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या निषेधार्थ ठेवीदार सरकार व आरबीआयविरोधात हल्लाबोल करणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्यासह सुरतमध्ये ज्या ज्या ठिकाणी न्यू इंडिया सहकारी बँकेच्या शाखा आहेत, त्या त्या विभागांत पुढील दहा ते पंधरा दिवसांत चौकसभा घेणार आहोत. यावेळी न्यायालयीन लढ्याची तयारी करण्यासह सरकार आणि आरबीआयच्या लपवाछपवी धोरणाचा निषेध केला जाईल. त्यानंतरही ग्राहकांच्या पैशांबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत तर आरबीआय कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असे ठेवीदारांतर्फे काँग्रेस नेते युवराज मोहिते आणि आपचे नेते धनंजय शिंदे यांनी सांगितले.
सोशल मीडियातून एकजुटीचे आवाहन
सरकार व आरबीआयने वाऱ्यावर सोडल्यामुळे ठेवीदारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ‘गुगल फॉर्म’द्वारे ग्राहकांचा तपशील तसेच ठेवींची माहिती गोळा केली जात आहे. लवकरात लवकर याचिका दाखल करण्याचा ठेवीदारांचा प्रयत्न आहे.
सहकारी बँका गिळंकृत करण्याचा भाजपचा डाव!
भाजप नेते अमित शहा हे केंद्रीय सहकार मंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील सहकारी बँका गिळंकृत करण्याचा डाव रचला आहे. आम्ही त्यांचा हा डाव हाणून पाडू, सुरतमध्ये जाऊन तेथील ठेवीदारांच्या भेटी घेऊ आणि ‘लुटमारी’च्या गुजरात मॉडेलची पोलखोल करू, असा इशारा ‘आप’ नेते धनंजय शिंदे यांनी दिला.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List