‘छावा’च्या यशासाठी विकी-रश्मिकाचं शिर्डीच्या साईबाबांकडे साकडं
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या 14 फेब्रुवारीला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी यातील मुख्य कलाकार विकी कौशल आणि रश्मिका मंदाना हे शिर्डीत साई दरबारी पोहोचले. विकी आणि रश्मिका पहिल्यांदाच शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी आले होते. चित्रपटाच्या यशासाठी दोघांनी साईबाबांकडे साकडं घातलं. रश्मिकाच्या पायाला इजा झाली असतानाही पट्टी बांधून ती मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी विकीनेही तिची मदत केली. या दोघांनी साई समाधींचं मनोभावे दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“आयुष्यात कुठलंही शुभकार्य करण्याआधी देवाचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच आम्ही आज साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहोत. सर्वांची प्रगती होऊ दे आणि सर्वांना आनंदी ठेव, अशी प्रार्थना मी साईंच्या चरणी केली”, असं विकी म्हणाला. तर रश्मिकानेही पहिल्यांदाच शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी एका पत्रकाराने तिला मराठीत प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर मराठीत देण्यासाठी विकीने तिची मदत केली. “शिर्डीत येऊन कसं वाटलं”, असा प्रश्न रश्मिकाला विचारण्यात आला. त्यावर विकीचं ऐकून रश्मिका म्हणाली, “साईबाबांचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं.’
‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटात अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या, रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई भोसलेंच्या तर अभिनेता अक्षय खन्ना हा औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टीझरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकीने मोठ्या पडद्यावर कशी साकारली, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 8 तारखेपासूनच या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची सुरुवात झाली. त्यालाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. दरम्यान ‘छावा’मधील काही सीन्स आणि डायलॉग्स यांमध्ये बदल सुचवत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला ‘युए 16+’ची रेटिंग दिली आहे. या चित्रपटाचा रनटाइम 161 मिनिटं आणि 50 सेकंद म्हणजेच जवळपास 2 तास 42 मिनिटं इतका आहे. शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर चित्रपटाची कथा आधारित आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List