महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले सहा जण बुडाले
महाशिवरात्रीनिमित्त नदीवर अंघोळीसाठी परिवारासोबत गेलेल्या तीन सख्ख्या बहिणी वैनगंगा नदीत बुडाल्या. यापैकी एकीचे प्रेत मिळाले असून, दोघींचा शोध सुरू आहे. आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील प्रकाश मंडल हे आपल्या परिवारातील आठ जणांसह गडचिरोली मार्गावरील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेले. पात्रात उतरल्यावर कविता मंडल, प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल या सख्ख्या बहिणी पाण्याचा अंदाज आल्याने खोलात गेल्या. पोहता येत नसल्याने त्या बुडायला लागल्या. तर एक मुलगा आणि महिलाही प्रवाहात लागल्या. आरडाओरड सुरू झाली, मात्र मदतीला कुणीही नव्हते. यातील तो मुलगा आणि महिला पत्रातील खडक हाताला लागल्याने त्याला पकडून राहिले.
मात्र तीन बहिणी बेपत्ता झाल्या. यातील कविता मंडल हिचे शव मिळाले असून, दोघींचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतल्याने खडकाला पकडून असलेल्या मुलाला आणि महिलेला वाचवण्यात यश मिळाले. आज महाशिवरात्री असल्याने अनेक भाविक नदी पात्रात अंघोळीसाठी जातात. पण पोहण्याचा अनुभव आणि पत्रातील पाण्याचा अंदाज नसल्याने घात होतो. ही घटनाही तशीच आहे.
तीन युवक बुडाले
अशाच एका दुसऱ्या घटनेत, महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले तीन युवक नदीच्या पात्रात बुडाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. या तिघांचाही सध्या शोध सुरू आहे. राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील हे युवक असून ते शेजारच्या लोकांसोबत जवळच्या वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. तुषार शालिक आत्राम (वय 17), मंगेश बंडू चणकापुरे (वय 20), अनिकेत शंकर कोडापे (वय 18) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच्या काही लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. आता चंद्रपूर येथून बचाव पथक पाठवण्यात आले असून, शोध घेतला जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List