तानसाच्या अभयारण्यात बिबट्या दिसला रे… साखरोलीच्या जंगलात ट्रॅप कॅमेऱ्यात छबी कैद
तरस, भेकर, रानडुक्कर, नीलगाय, चौशिंग, ससे, माकड, वानर, रानमांजर आदी वन्यप्राणी वास्तव्य करीत असलेल्या तानसा अभयारण्यात आता बिबट्याची स्वारीही आली आहे. वन विभागाने साखरोली येथील जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याची छबी कैद झाली आहे. काही ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसेही आढळून आले आहेत. या अभयारण्यात बिबट्याची स्वारी आल्यामुळे निसर्गप्रेमी आणि वन्यजीवप्रेमी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील 320 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात तानसा अभयारण्याचा विस्तार झालेला आहे. या अभयारण्यातील वाडा, तानसा, वैतरणा, खर्डी, परळी, सूर्यमाळ या भागांतील पाणवठ्याच्या लगत असलेल्या दाट जंगलात तरस, भेकर, रानडुक्कर, नीलगाय, चौशिंग, ससे, माकड, वानर, रानमांजर या वन्यजीवांचे वास्तव्य आहे. दरवर्षी वन्यजीव विभागाकडून अभयारण्यात प्रगणना केली जाते. या प्रगणनेत बिबट्याचे ठसे मात्र यापूर्वी वन्यजीव विभागाला आढळून आले नाहीत. यामुळे तानसाच्या जंगलात बिबट्यांचा अधिवास आहे की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. परंतु काही दिवसांपूर्वी साखरोली जंगलात कंपार्टमेंट नंबर 903 मध्ये लावलेल्या एका ट्रॅप कॅमेऱ्यात नर जातीच्या बिबट्याची सुंदर अशी छबी कैद झाली. बिबट्याच्या पाऊल खुणादेखील वन कर्मचाऱ्यांना तेथे आढळून आल्याने तानसाच्या जंगलात बिबट्यांचा अधिवास असल्याचे वन विभागाने जाहीर केले आहे.
विसाव्याचे ठिकाण
बिबट्यांचे तानसा अभयारण्यात अधिवास असणे हा वन्यजीवप्रेमींसाठी प्रचंड आनंददायी व कुतूहलाचा विषय ठरला आहे. या बिबट्याचे छायाचित्रे पाहून वन्यजीवप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे. बिबट्यांचा वावर हा तानसाच्या जंगलात यापूर्वीही आढळून आलेला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List