मिंध्यांच्या वाढदिवसाच्या क्रिकेट सामन्यात धिंगाणा, कोपरीच्या तुकाराम मैदानात गुंडांच्या दोन टोळ्या भिडल्या
मिंधे पिता-पुत्रांच्या वाढदिवसानिमित्त कोपरीच्या तुकाराम मैदानात आज क्रिकेटचा सामना भरवण्यात आला होता. या सामन्यात चौकार-षटकारांऐवजी गुंडांच्या दोन टोळ्या एकमेकांना भिडल्या. किरकोळ वादानंतर जोरदार हाणामारी झाली. त्यात परस्परांची डोकीही फोडली गेली. मैदानात गुंडांनी घातलेल्या धिंगाण्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून या प्रकरणी कोपरी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. दरम्यान मिंधे गटाचा ‘यूट्यूब भाई’ म्हणून प्रसिद्ध असलेला पदाधिकारी सिद्धू अभंगे याच्यासह दोन्ही टोळ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
कोपरी येथील संत तुकाराम मैदानात २ ते ५ फेब्रुवारी यादरम्यान सिद्धेश अभंगे फाऊंडेशनतर्फे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यावेळी क्रिकेट संघातील काही खेळाडूंचा आयोजकांनी दिलेल्या निर्णयावरून वाद झाला. काही वेळातच या वादाचे परिवर्तन नंतर जोरदार हाणामारीत झाले. भर मैदानात बॅट, स्टॅम्प आणि रॉड हातात घेऊन डोकी फोडण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती कोपरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आयोजक आणि खेळाडूंना ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन्ही गटांविरोधात पोलिसांनी परस्पर गुन्हे दाखल केले आहेत.
याच भागात पोलीस आयुक्तांचे निवासस्थान
कोपरी परिसरात ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह अनेक शासकीय अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने आहेत. त्यामुळे हा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. असे असताना या भागात दिवसाढवळ्या गुंडांचा सर्रास वावर असल्याने कोपरी पोलिसांच्या कारभारावर सुसंस्कृत नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे.
क्रिकेट सामान्यांच्या दरम्यान मारामारी झाली. यामध्ये सिद्धू अभंगे, सनी गेडाम, चंद्रमणी, शरनाम, सोन्या, जय आणि घाऱ्या अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे असून पुढील तपास सुरू आहे. – निशिकांत विश्वकार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरी पोलीस ठाणे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List