ग्रामीण भागात एसटी रुबाबात धावणार, नव्या गाड्यांच्या समावेशाने लांबपल्ल्याचा प्रवास सुखकर होणार
एसटी महामंडळात स्वमालकीच्या २६४० बसेस टप्प्या टप्प्याने दाखल होत आहेत. पहिल्या टप्प्यातील ११० बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस अशोक लेलॅण्ड कंपनीच्या आहेत. या बसेसचे वैशिष्ट्ये म्हणजे त्या एसटी ओळख बनलेल्या परिवर्तन बसेसच्या धर्तीच्या ( २ बाय २ ) अशा मोठ्या आकाराच्या आहेत. त्यामुळे लांबपल्ल्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे. पूर्वी एसटी चेसिस कंपन्यांकडून विकत घ्यायची आणि त्यावर आपल्या कारखान्यात आपल्या गरजेनुसार एसटीची बांधणी करायची. या चेसिस अनेक कंपन्यांच्या असायच्या. आता एसटी थेट अख्खीच्या अख्खी बस रेडिमेड विकत घेतली असल्याने या बसेस वेगाने राज्यभरातील आगारात दाखल होणार आहेत. या बसेस डिझेलवर धावणाऱ्या असल्याने एसटीच्या प्रवाशांना त्याचा फायदा लांबपल्ल्यचा प्रवास करताना होणार आहे.
एसटी महामंडळाला बसेसची मोठी टंचाई जाणवत आहे. एसटीचा गाडा हा काही वर्षांपूर्वी तब्बल १८ हजार बसेसद्वारे हाकला जात होता, मात्र गेली अनेक वर्षे एसटीची नवीन बसेस खरेदी रखडली आहे. त्यातच कोरोना संकटामुळे एसटी आणखीन तोट्यात गेली आहे. या कोरोना साथीत एसटी बसेसची संख्या १६ हजारांवर आली आहे. या बसेस पैकी अनेक बसेसना अक्षरश: पत्रे जोडून ठिगळं लावल्याप्रमाणे गळती रोखल्याने एसटी खात्याची बदनामी होत आहे. या बसेस प्रदुषणात भर तर टाकत आहेत, शिवाय या बसेस रस्त्यात बिघडत असताना प्रवाशांना मन:स्ताप होत आहे. यामुळे एसटीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत आहेत.
ग्रामीण भागात एसटी रुबाबात धावणार
एसटी महामंडळात नवीन बसेसचा समावेश झाल्याने ग्रामीण भागातील लोकांची अडचण दूर होणार आहे. या बसेसमधून शाळकरी विद्यार्थ्यांना सवलत आहे. तर मुलींना १२ पर्यंतचा प्रवास मोफत आहे. त्यामुळे एसटीचा उपयोग ग्रामीण भागातील महिलांच्या शिक्षणांसाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यातच आता महिलांना अर्धे दरात तिकीट मिळत असल्याने एसटीची प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतू एसटीकडे गाड्यांची उपलब्धता नसल्याने या प्रवासी संख्येचा लाभ महामंडळाला घेता येत नव्हता. आता नवीन २६४० बसेस टप्प्या टप्प्याने दाखल होत असल्याने एसटी महामंडळाला पुन्हा ऊर्जितावस्था येणार असून एसटी पुन्हा एकदा फायद्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List