दिल्लीतील भाजप उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला आहे. त्यातच आता भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रवेश वर्मा हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, आता प्रवेश वर्मा यांच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे. दिल्लीतील मतदारांना बूट वाटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बूट वाटपाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतप त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात प्रवेश वर्मा निवडणूक लढवत आहेत. नवी दिल्ली मतदारसंघात मतदारांना बूट वाटताना दाखवलेल्या एका व्हिडिओनंतर वर्मा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्या विरोधात भाजपने उभे केलेले उमेदवार प्रवेश वर्मा आहेत.
रिटर्निंग ऑफिसरने स्टेशन हाऊस ऑफिसरला खटला नोंदवण्याचे निर्देश दिल्यानंतर आणि तक्रारदार वकील रजनीश भास्कर यांनी शेअर केलेले व्हिडिओ फॉरवर्ड केल्यानंतर वर्माविरुद्ध गुन्हा दाखल करत खटला सुरू करण्यात आला आहे. तक्रारदाराने दोन व्हिडिओ फॉरवर्ड केले आहेत, ज्यात प्रवेश वर्मा महिलांना बूट वाटताना दिसत आहेत, असे आरओने एसएचओला लिहिले. निवडणुकीदरम्यान उमेदवाराने दिलेली कोणतीही भेटवस्तू, ऑफर किंवा आश्वासन लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम 123 नुसार भ्रष्ट पद्धतींमध्ये येते. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल वर्माविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List