सरसंघचालक भागवतांच्या ‘खऱ्या स्वातंत्र्या’च्या वक्तव्याला ‘देशद्रोह’ म्हणत राहुल गांधींचं प्रत्युत्तर
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच विधान केले होते की, राम मंदिर बांधल्यानंतर हिंदुस्थानला ‘खरं स्वातंत्र्य’ मिळालं. या विधानावरून राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांना लक्ष्य केलं आहे. असं विधान करणं म्हणजे ‘देशद्रोह’ असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
काँग्रेसच्या नवीन मुख्यालय इंदिरा भवनच्या उद्घाटनानंतर पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना गांधी म्हणाले की भागवत यांचे वक्तव्य स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान आणि संविधानावरचा हल्ला आहे.
‘मोहन भागवत हे दर 2-3 दिवसांनी स्वातंत्र्य चळवळ आणि संविधानाबद्दल त्यांचे मत व्यक्त करतात. त्यांनी काल जे म्हणलं तसं म्हणणे म्हणजे देशद्रोह आहे. कारण ते म्हणाले होते की संविधान अवैध आहे, ब्रिटिशांविरुद्धचा लढा अवैध आहे. हे जाहीरपणे बोलण्याचं धाडस ते करतात. इतर कोणत्याही देशात, अशा प्रकारच्या विधानांसाठी त्यांना अटक केली जाईल आणि खटला चालवला जाईल’, असं राहुल गांधी म्हणाले.
याआधी, मोहन भागवत यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापन दिनी हिंदुस्थानने ‘खरं स्वातंत्र्य’ मिळवलं असा दावा केल्यानंतर वाद निर्माण झाला. त्यांनी हा दिवस ‘प्रतिष्ठा द्वादशी’ म्हणून साजरा करण्याची सूचनाही केली.
सरसंघचालकांच्या वक्तव्याला ‘प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाचा अपमान’ असं संबोधून राहुल गांधी म्हणाले, ‘आता वेळ आली आहे की आपण हे मूर्खपणा ऐकणे थांबवावं. कारण हे लोक समजतात की ते फक्त पोपटपंची करत राहतील, आरडाओरड करत राहतील’.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List