लोकांचा आक्षेप आकाच्या ‘आका’वर, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत…’, संजय राऊत यांचा हल्लाबोल
वाल्मीक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. त्यानंतर त्याच्या समर्थकांना परळीमध्ये राडा घातला. दुसरीकडे अजित पवार गटाने बीडची कार्यकारिणी बरखास्त केली असून चारित्र्यवान लोकांनाच पदावर घेण्याचे ठरवले आहे. मात्र जोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत या कृतीला अर्थ नाही. कारण लोकांचा आक्षेप आकाच्या आकावर असून त्याच्यावरती कारवाई करायची हिंमत दाखवा. तर संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास निपक्षपाती होईल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. बुधवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ती व्यक्ती मंत्रिमंडळात आहे. अजित पवार गटात आहे आणि हे चारित्र्यवान व्यक्तींसंदर्भात चर्चा करताहेत. चारित्र्यवान कुणाला म्हणावे हे आता वर जाऊन धर्मराजाला विचारावे लागेल. चारित्र्याची नक्की व्याख्या काय हे भगवतगीतेत शोधावे लागेल, श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथावरून चारित्र्यावर काय प्रवचण दिले आहे. कारण चारित्र्यवान लोक अजित पवार घेणार असून सुरुवात कुणापासून करणार हा प्रश्न आहे.
वाल्मीक कराडला मोक्का लावणे आणि त्यानंतर त्याच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणे हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. पंतप्रधान मुंबईत असताना महाराष्ट्राच्या एका भागात मणिपूरप्रमाणे हिंसाचार होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, असेही राऊत म्हणाले.
एखाद्या गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई सुरू असताना भाजपचे समर्थक म्हणवून घेणारे लोक रस्त्यावर उतरतात, हिंसाचार करतात, परळी बंद ठेवतात, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात हा काय प्रकार आहे. आम्ही एखादे आंदोलन केले तर परवानगी मिळणार नाही, आमच्या लोकांना तुरुंगात टाकतील. मग इथे का शेपूट घालताय? असा सवाल करत या प्रकरणात कारवाई झालेली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आता आपण सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे, असे आवाहनही राऊत यांनी केले.
दरम्यान, देशात अनेक गृहमंत्री झाले पण त्यांच्यापैकी कोणी तडीपार झाले नव्हते, असे विधान शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केले. गुजरातमध्ये राहता येत नव्हते तेव्हा शहांनी ‘मातोश्री’वर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन मदतीची विनंती केली होती, याचीही आठवण पवार यांनी करून दिली. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, त्या काळात अमित शहा अनेकांचे दरवाजे मदतीसाठी ठोकत होते. माणूस संकटात असताना अनेकांचे दरवाजे ठोठावतो. पण ज्याने संकटकाळात मदत केली, अशा नेत्याच्या आणि कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा आम्ही कधी पाहिली नाही.
शरद पवार यांनी थोडी अर्धवट माहिती सांगितली. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. पण काही गोष्टी गोपनीय असतात. केलेली मदत, दान या हाताचे त्या हाताला कळता कामा नये ही आमची वृत्ती आहे. हा हिंदुत्वाचा धर्म असून आम्ही हिंदुत्ववादी आहोत, असेही राऊत म्हणाले. तसेच शिवसेनेने, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींनाही मदत केली होती. अख्खा देश मोदींविरोधात असताना आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडून मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून काढायची तयारी पूर्ण झालेली असताना फक्त बाळासाहेब असे एकमेव नेते होते जे मोदींच्या बाजुने ठामपणे उभे होते. अमित शहांबाबतही तसे काही घडले असावे, त्याशिवाय शरद पवार काही बोलणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List