दक्षिण-मध्य मुंबईत सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सव
कला, क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन मिळावे तसेच उदयोन्मुख तरुणांना चांगली संधी मिळावी या हेतूने याही वर्षी दक्षिण-मध्य मुंबईकरांसाठी शिवसेनेतर्फे 18 जानेवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सदर महोत्सवाचे माहितीपत्रक आणि बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव पार पडणार असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेसह क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस, पॅरम, बुद्धिबळ, पंजा, रस्सीखेच, मल्लखांब, योगासने, जिम्नॅस्टिक्स, अॅक्रोबॅटीक, कबड्डी व दहीहंडी या नावीन्यपूर्ण विविध खेळांचादेखील यात समावेश आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्रांत या स्पर्धांचे आयोजन केले जाणार असून सर्व स्पर्धांकरिता एकूण रुपये 9 लाख 31 हजार रकमेची आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून इच्छुक स्पर्धक हा दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील रहिवाशी असणे अनिवार्य आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने पुरुष-महिला, तरुण-तरुणींनी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करावे आणि भरघोस बक्षिसे जिंकावीत, असे आवाहन खासदार अनिल देसाई यांनी केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List