‘अबोली’ मालिकेत दोन नायिकांची धमाकेदार एण्ट्री; एक ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री तर दुसरी..
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ या मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. लवकरच कथानकातलं गूढ आणखी वाढणार आहे, कारण मालिकेत इन्स्पेक्टर दिपशिखा भोसले आणि शिवांगी देशमाने यांची एण्ट्री होत आहे. इन्स्पेक्टर दिपशिखाच्या भूमिकेत ‘बिग बॉस मराठी 5’ फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि शिवांगी देशमानेच्या भूमिकेत अभिनेत्री मयुरी वाघ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी किल्लेकर साकारत असलेल्या दिपशिखा या पात्राला तिच्या वर्दीचा प्रचंड माज आहे. समोरच्या व्यक्तीला कमी लेखण्याची वृत्ती, विरोधकांना चिरडून टाकण्याचं कसब आणि तिची चौकस बुद्धी यामुळे तिची गुन्हेगारांमध्येच नव्हे तर संपूर्ण पोलीस क्षेत्रात चांगलीच दहशत आहे.
लाच घेणं किंवा एखादं बेकायदेशीर काम करणं यात तिला काही गैर वाटत नाही. जर खाकी घालून मी कायद्याचं रक्षण करत असेन तर या खाकीचा फायदा मला झालाच पाहिजे.. हे तिच्या आयुष्याचं तत्व आहे. तिच्या कर्तबगारपणामुळेच तिच्या वाईट गोष्टी कधीच लोकांसमोर आल्या नाहीत. तिने केलेली बेकायदेशीर कामं देखील ती खूप सराईतपणे लपवते. अशा या डॅशिंग दिपशिखा भोसलेपाटीलचा एका केसच्या संदर्भात आता अबोलीसोबत सामना होणार आहे.
दिपशिखा प्रमाणेच मयुरी वाघ साकारत असेली शिवांगी बीडमधून मुंबईला आपल्या बहिणीच्या शोधात आली आहे. तिची बहीण समृद्धी लग्नासाठी मुंबईला आली असताना अचानक गायब झाली आणि तिच्याच शोधासाठी शिवांगी धडपड करतेय. समृद्धीचा खून झाला असेल असं लोक म्हणत असले तरी त्यावर शिवांगीचा विश्वास नाहीये. साधी- सरळ, हतबल आणि परिस्थितीने पिचलेल्या शिवांगीला अबोली आधार देते. शिवांगीच्या बहिणीच्या शोधात तिची भेट अबोली प्रमाणेच इन्स्पेक्टर दिपशिखासोबत सुद्धा होते. त्यामुळे या केसला नवं वळण मिळणार आहे. ‘अबोली’ ही मालिका रात्री 11 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
जान्हवी किल्लेकरने कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘सानिया’ हे खलनायिकेचं पात्र रंगवलं होतं. त्यासोबतच ती ‘श्री स्वामी समर्थ’ या मालिकेतही झळकली होती. पण जान्हवीला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी 5’ व्या सीजनमुळे. तर मयुरी वाघ ही ‘अस्मिता’ आणि ‘ती फुलराणी’ यांसारख्या मालिकांसाठी ओळखली जाते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List