‘6 वर्षांत अनेकदा आत्महत्येचा विचार’; लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर साजिद खानचा खुलासा
‘मी टू’ मोहिमेअंतर्गत 2018 मध्ये दिग्दर्शक साजिद खानविरोधात अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे धक्कादायक आरोप केले. त्यावेळी तो ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. या आरोपांचा साजिदच्या आयुष्यावर आणि करिअरवर खूप मोठा परिणाम झाला. रातोरात त्याला प्रोजेक्ट्समधून काढून टाकण्यात आलं होतं. या आरोपांबद्दल सहा वर्षे मौन बाळगल्यानंतर अखेर साजिद खानने व्यक्त होण्याचं ठरवलं आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत साजिदने गेल्या काही वर्षांत त्याच्या आयुष्यावर काय परिणाम झाला, याविषयी मोकळेपणे सांगितलं.
‘मी टू’चे आरोप झाल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून तुझं आयुष्य कसं आहे?
साजिद- “गेल्या सहा वर्षांत मी अनेकदा माझं आयुष्य संपवण्याचा विचार केला. हा काळ अत्यंत वाईट होता. इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनकडून (IFTDA) क्लिन चिट मिळाल्यानंतरही माझ्या हाती काम नव्हतं. आता कुठे मी माझ्या पायांवर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. मला माझं घर विकून भाड्याच्या घरात राहावं लागलं, कारण कमाई काहीच नव्हती. माझे वडील कमरान खान यांच्या निधनानंतर मी वयाच्या 14 व्या वर्षापासूनच काम करू लागलो होतो. माझ्यावर आणि बहीण फराह खानवर बरंच कर्ज ठेवून ते गेले होते. आज मी माझ्या पायांवर पुन्हा उभा असल्याचं पहायला माझी आई जिवंत हवी होती. माझं आयुष्य खूप कठीण होतं.”
आरोप आणि त्यानंतर खटला यांना तू कसा सामोरं गेलास?
साजिद- “मी ‘हाऊसफुल 4’ हा प्रोजेक्टच सोडला. निर्माते साजिद नाडियादवाला यांनी 10-15 कलाकारांसाठी मोठा सेट बनवला होता. त्यांच्या तारखा बदलावं लागलं असतं तर चित्रपट बनायला वर्षे लागली असती. माझ्यासोबत मीडिया ट्रायल झाला होता, पूर्णपणे एकाच बाजूने. मी माझ्या आक्षेपार्ह विनोदासाठी ओळखला जायचो. पण मी कधीच कोणत्या महिलेचा अपमान केला नव्हता आणि करणारही नाही. माझ्या आईने मला स्त्री-पुरुष समानतेची बाब शिकवली. मला माहित नव्हतं की माझ्या शब्दांची किंमत मला इतकी मोठी चुकवावी लागेल.”
आरोपांवर कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती?
साजिद- “हे सर्व घडण्याच्या दहा दिवस आधी मी राजस्थानमधील जैसलमेरमध्ये शूटिंग करत होतो. माझ्या आईची प्रकृती ठीक नव्हती. मी चित्रपट सोडल्याचं कळताच तिला हार्ट अटॅक येईल की काय, अशी भीती मला होती. मी बहीण फराहला सांगितलं की आईपासून सर्व वर्तमानपत्रे लपवून ठेव. दहा दिवसांपर्यंत मी असं दाखवलं की सर्वकाही ठीक आहे. रोज सेटवर कामाला गेल्यासारखं घराबाहेर पडत होतो, त्याच वेळी घरी येत होतो. मी कधीच कोणत्या महिलेबद्दल वाईट बोललो नाही आणि बोलणारही नाही. पण अर्थातच गेल्या सहा वर्षांत मी स्वत:ला अनेक प्रश्न विचारले. मी टू मोहिमेत ज्यांची नावं समोर आली होती, ते सर्वजण कामावर परतले, पण मला कामच मिळत नव्हतं. याचं मला खूप वाईट वाटत होतं. मला फक्त माझं आयुष्य बदलण्याची नाही तर लोकांशी कसं बोलायचं, तेही बदलण्याची गरज असल्याचं वाटलं. मी आता स्वत:ला खूप प्रतिबंधित केलंय.”
इतकी वर्षे तू गप्प का राहिलास?
साजिद- “मला बोलायचं नव्हतं. माझी आई म्हणायची की, मौन हे सोन्यासारखं असतं. समज धुक्यासारखी असते, ती साफ करावी लागते.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List