धर्मांतराच्या दबावामुळे ब्रेकअप केल्याच्या चर्चा; आता अभिनेत्रीने थेट सोडली इंडस्ट्री?
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनियाने ‘स्पिट्सविला’ या शोमधून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘गीत हुई सबसे पराई’ या मालिकेतून टीव्ही विश्वात पाऊल ठेवलं. पवित्रा आज टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिचं हे स्वप्न कधीच नव्हतं. नशिब आणि योगायोगाने ती टीव्ही विश्वात आली आणि इथे तिला अपेक्षेपेक्षा अधिक प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. पवित्राने ‘इश्क की दास्तां’ या मालिकेत अखेरचं काम केलं. त्यानंतर ती कोणत्या मालिकेत झळकली नाही. त्यामुळे तिने अभिनयक्षेत्राला रामराम केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर खुद्द पवित्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.
‘टेली मसाला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पवित्राने स्पष्ट केलं की तिने अभिनयक्षेत्र सोडलेलं नाही. परंतु ती आता कोणत्या प्रोजेक्टच्या प्रतीक्षेतही नाही. याविषयी ती पुढे म्हणाली, “नाही, मी इंडस्ट्री सोडली नाही. परंतु मी कधी या इंडस्ट्रीला पकडलंसुद्धा नव्हतं. मला अभिनेत्री बनायचं नव्हतं. मी सेटवर कधी काम करू लागले, मलाच समजलं नाही. इथपर्यंत मी कशी पोहोचले, हेसुद्धा मला माहीत नाही. या इंडस्ट्रीत माझं स्थान आहे की नाही, याबद्दलही मला काहीच माहीत नाही. मला फक्त इतकंच माहितीये की तुमचे जितके दिवस जिथे लिहिलेले असतात, तिथे तुम्ही काम करता. वर्तमानकाळावर लक्ष केंद्रीत करण्यावर मी अधिक भर देते. त्यामुळे सध्या मी माझ्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतेय.”
“गेल्या अनेक वर्षांपासून मला सोलो ट्रॅव्हल करायचं होतं. अखेर ते स्वप्न मी पूर्ण करतेय. फिरताना मला खूप मजा येतेय. मी विविध लोकांना भेटतेय, त्यांची मानसिकता जाणून घेतेय. एकंदरीत हा सगळा अनुभव खूप वेगळा आणि सुंदर आहे”, असं तिने सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून पवित्रा तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. बिग बॉसनंतर ती अभिनेता एजाज खानला डेट करत होती. हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला. एजाजने धर्मांतरासाठी दबाव टाकल्याने पवित्राने ब्रेकअप केल्याच्या चर्चा होत्या. मात्र मी कधीच धर्मांतर करणार नाही, असं मी एजाजला रिलेशनशिपच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं, असं पवित्राने सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List