अहिल्यानगरमध्ये ‘मुस्कान’मुळे 292 मुली सुखरुप परतल्या, पोलिसांनी 1 ते 31 डिसेंबरपर्यंत राबवली मोहीम
प्रेमाच्या जाळ्यात ओढत गेल्या वर्षभरात 460 अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तपास करून 292 मुलींना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे, तर 168 मुलींचा शोध अजूनही सुरू आहे. प्रेमप्रकरण आणि मानसिक तणावातून या मुली अपहरणाच्या शिकार झाल्या असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत ऑपरेशन मुस्कान राबवून शेकडो मुले-मुली व त्यांच्या नातेवाईकांचा शोध लावला आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्याने पोलीस खात्याला चांगल्या प्रकारचे यश आले आहे असे म्हणावे लागेल.
नगर जिल्ह्यातील अनेक भागातून मुलींचे अचानकपणे गायब होण्याचे प्रकार वाढत चाललेले आहे. मोबाईलचा अतिवापर, पालकांचे दुर्लक्ष, कुटुंबातील मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी मुले-मुली दडपणाखाली वावरतात. याच कारणातून १४ ते १७ वयोगटातील ४६० अल्पवयीन मुली अपहरणाच्या शिकार ठरल्या आहेत. घरातील ताणतणावाला कंटाळून अल्पवयीन मुलांनीदेखील घर सोडल्याची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत.
जिल्ह्याचा आढावा घेताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यासंदर्भात आगामी काळामध्ये कशा पद्धतीने नियोजन करून यांचा शोध लावता येईल, याकरिता विविध प्रकारे बैठका घेत मार्गदर्शन केले. तसेच इतर जिल्ह्यांतील पोलिसांशी समन्वय साधक कशा पद्धतीने मार्ग काढता येईल, याकरिता सातत्याने प्रयत्न सुरू ठेवलेले होते.
शहरासह ग्रामीण भागातूनही मुलींचे अपहरण होत आहे. मुली बेपत्ता झाल्यानंतर पालक त्यांचा शोध घेतात. त्यानंतर ते पोलिसांकडे धाव घेतात. गेल्या वर्षभरात असे ४६० गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. पोलिसांनी या मुलींचा शोध घेण्याचे काम केले आहे. पोलिसांना २९२ मुलींचा शोध घेण्यात यश आले आहे.
या मुलींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक प्रत्येक ठिकाणी पाठविण्यात आलेले होते. मोठ्या प्रमाणामध्ये यांचा शोध घेण्यासाठी या पोलिसांनी प्रयत्न केले, त्यामुळे हे यश मिळाले. पण, दुसरीकडे शोध लागला तरी मात्र मुली गायब होण्याचे प्रकार काही थांबायला तयार नाहीत.
या मुलींना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. १६८ मुली अजूनही बेपत्ता असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे, त्यांना विश्वासात घेतले पाहिजे, तसे झाले तर अपहरणासारखे प्रकार घडणार नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
ऑपरेशन मुस्कान
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले आहे. त्यात बेपत्ता झालेली मुले-मुली, सापडलेल्या मुलांच्या नातेवाईकांचा शोध, हॉटेल, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी मिळून आलेल्या मुलांच्या नातेवाईकांचा शोध या ऑपरेशन मुस्कानद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे ऑपरेशन राबविण्यात येत आहे.
बेपत्ता होण्याची कारणे
प्रेम प्रकरण, प्रेमभंग, कौटुंबिक, मानसिक तणाव, पालकांमधील मतभेद, पालकांकडून न मिळणारे प्रेम, अभ्यासाचा तणाव यांसारखी अनेक कारणे मुलांच्या घरातून निघून जाण्यासाठी कारणीभूत ठरतात. विशेष म्हणजे त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मोबाईलचा अतिवापर चिंताजनक आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. मुले-मुली जेव्हा घरातून निघून जातात, तेव्हा ते फोन बंद करून ठेवतात. त्यामुळे तपासात अडचणी येतात. अशा घटना घडूच नये, यासाठी पालकांनीच जागरूक राहणे आवश्यक आहे.
– दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List