श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्मसोहळा उत्साहात, श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत भाविकांची अलोट गर्दी
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरात बुधवारी (१ जानेवारी) दुपारी १२ वाजता श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
गेले सात दिवस सुरू असलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यात येथील दत्त देव संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथील कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी १२ वर्षे तपश्चर्या करून ‘मनोहर पादुकां’ची स्थापना केली. त्यांच्या या तपसाधनेनेच या गावाला ‘नृसिंहवाडी’ हे नाव मिळाले असल्याने या जन्मोत्सवास येथे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
येथील श्री दत्तमंदिरात बुधवारी पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा झाल्यावर ‘श्री’ चरणांवर रुद्राभिषेक करण्यात आला. उत्सवकाळात सुरू असलेल्या ‘श्रीमद् गुरुचरित्र’ पारायणाची बुधवारी सांगता करण्यात आली. वेदमूर्ती दिलीपशास्त्री उपाध्ये यांचे पुराण व दुपारी १२ वाजता ‘श्री गुरुदेव दत्त’च्या गजरात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मकाळ सोहळा उत्साहात झाला. याप्रसंगी भाविकांनी आकर्षक फुलांनी सजविलेल्या ‘श्रीं’च्या चांदीच्या पाळण्यावर अबीर, गुलाल व फुलांची मुक्तहस्ते उधळण केली. मानकरी अवधूत पुजारी यांनी ‘श्रीं’ची विधिवत पूजा केली. येथील ब्रह्मवृंदांनी पाळणा म्हटला. महिलांनी ‘श्रीं’चा पाळणा जोजविला व मंगल आरतीने ओवाळले. यानंतर भक्तांना सुंठवडावाटप करण्यात आले. यावेळी करवीर पीठाचे जगद्गुरू विद्या नृसिंह भारती व संकेश्वर पीठाचे जगद्गुरू सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती उपस्थित होते. दिगंबर श्रीपाद पुजारी व परिवार यांनी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली होती.
सायंकाळी ह.भ.प. राहुलबुवा गणोरकर यांचे कीर्तन व रात्री साडेसात वाजता धूप, दीपआरती व पालखी सोहळा होऊन रात्री ९.३० वा शेजारती करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List