लेख – मुंबईत मराठी प्रथम, नंतर इतर!
>> अजित कवटकर
मराठी माणसाला हटवून आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न मराठी माणसाला कुठे नेऊन ठेवणार आहे? भाषेला अनुसरून व त्याच आधारावर आपल्या राष्ट्राची प्रांत रचना झाली आहे. तेव्हा हा महाराष्ट्र आणि ही मुंबई निर्विवादपणे मराठी माणसाचीच आहे. म्हणूनच तर ती ‘आपली मुंबई – मराठी मुंबई’ आहे. इथे प्रथम मराठी आणि नंतर इतर सर्व. इथे येणाऱ्या, राहणाऱ्या प्रत्येकाने ही साधी सोपी गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी.
हिंदुस्थानची आर्थिक राजधानी मुंबई हे अगदी सुरुवातीपासूनच संपूर्ण जगाचे आकर्षण राहिले आहे. म्हणूनच की काय, इथे येऊन नोकरी-व्यवसाय करण्याची, स्थायिक होण्याची संपूर्ण देशात जणू घाईच लागलेली दिसते. बाहेरील राज्यांतून शेकडोंच्या संख्येने इथे रोज उतरणारे लोंढेच्या लोंढे याची साक्ष देतात. संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचे प्रतिबिंब ज्या शहरात पडते ते ‘मुंबई.’ ‘अतिथी देवो भवः’ चा साक्षात्कार जर कुठे प्रत्यक्षात अनुभवास येतो, तो मुंबईतच. आपल्या मुंबईने सर्वांना स्वीकारले, प्रत्येकाला प्रगतीची समान संधी दिली. कधी कोणामध्ये कसल्याही बाबतीत दुजाभाव – भेदभाव केला नाही. बाहेरून आलेल्याने आपल्या कर्तृत्वावर मोठे व्हावे आणि ती प्रगती साधण्यासाठी मुंबईने हातचे काहीच राखून न ठेवता सढळ हस्ते त्यावर उदार व्हावे ही रीतच इथे रूढ झाली आणि त्याची प्रचीती इथे आलेल्या प्रत्येकाला आली. बाहेरून आलेल्यांनी इथली संस्कृती, इथली भाषा, इथे आचार-विचार स्वीकारावेत याचीदेखील कधी कुणावर सक्ती केली नाही. याउलट बाहेरची भिन्नता स्वीकारून ते आपल्यात समावून घेण्याचे औदार्य मुंबईच्या मराठी संस्कृतीने दाखवले. अशी ही मुंबई दिलदार, परोपकारी, महान. पण ही मुंबई म्हणजे नक्की कोण? मुंबई या भूभागाला एक मानवी व्यक्तिमत्वाचे रूप द्यावयाचे झाल्यास, ते निर्विवादपणे मुंबईचा भूमिपुत्र – मराठी माणूस म्हणूनच द्यावे लागेल. मुंबईचे आजचे ऐश्वर्य, श्रीमंती, दिमाख हे मराठी माणसाच्या रक्ताचे पाणी करण्याऱ्या मेहनतीमुळे आहे. माणुसकीच्या दृष्टीने मुंबईकर मराठी माणसाने सगळ्यांना आपल्या ओसरीवर आसरा दिला आणि तेच जेव्हा तिथे पाय पसरू लागले तेव्हा त्याकडेही मोठय़ा मनाने दुर्लक्ष केले. मात्र या सगळ्या चांगुलपणाने आज त्याची त्याच्याच भूमीत काय अवस्था करून ठेवली आहे?
मुंबईतील मराठी माणसाच्या टक्केवारीत गेल्या अनेक वर्षांमध्ये झालेली जबरदस्त घसरण आणि त्याची तुलना देशातील इतर राज्यांतील प्रमुख शहरांमधील तेथील भूमिपुत्राच्या तिथल्या टक्केवारीशी केल्यास आपल्या लक्षात येईल की, मुंबईतून मराठी माणूस ज्या मोठय़ा प्रमाणात निरंतर हद्दपार होत आहे, तेवढ्या संख्येने इतर कुठलाच भूमिपुत्र आपल्या प्रदेशातून स्थलांतर करताना दिसत नाही. मग मुंबईचा भूमिपुत्रच असा वाऱ्यावर का? इथे बाहेरच्यांना विरोध करण्याचा वा त्यांना अडविण्याचा मुद्दाच नाही, कारण मुंबई हिंदुस्थानची आहे, सर्वांची आहे. प्रश्न असा आहे की, मराठी माणसाला हटवून स्वतःला प्रस्थापित करण्याची मानसिकता इथे का व कोण रुजवत आहे? मुंबई व त्याच्या अवतीभोवतीच्या शहरांमध्ये बहुतांश वेळी मराठी माणसासाठीच दरवाजे बंद होताना दिसत आहेत. दुर्दैवाची वास्तविकता ही की, अशा प्रकारची शेकडो संकुलं मराठी वस्त्यांवर उभारली गेल्याचे दिसते आणि त्यात कुठेच मराठी माणसाचा मागमूसही सापडत नाही. अगोदर हे फार अपवादात्मक होते, परंतु गेल्या काही वर्षांत, याला भलताच जोर आल्याचे वा ताकद पुरवली जात असल्याचे जाणवत आहे. याला ‘व्होट बँक पॉलिटिक्स’चा आधार आहे, ही शंका आता प्रत्येक निवडणूक अधिकाधिक स्पष्ट करत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचा नरेटिव्ह ‘धार्मिक’ होता. विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह ‘जातीयवादी’ होता. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा नरेटिव्ह ‘भाषावादी’ असणार हे नक्की आहे. प्रचाराचे प्रमुख मुद्दे जरी इतर अनेक असणार असले तरी भाषेच्या आधारावर ध्रुवीकरण करून आपल्या व्होटबँकची मतं निर्णायक ठरविण्यासाठी विशेष प्रयत्न होणार. त्यात मराठी मतं जरी बहुसंख्येने असली तरी ती एकसंघ नसल्याकारणाने विभागली जाणार, कमजोर पाडली जाणार आणि इथेच धोका आहे. इतर राज्यांमध्येदेखील तेथील स्थानिक भाषिकांची मतं अशीच विखुरतात, परंतु तिथे बाहेरच्यांनी येऊन त्यांच्या भाषेला, संस्कृतीला, रुढी-परंपरांना, चालीरीतींना आणि एकूणच तिथल्या भूमिपुत्राच्या अस्तित्वाला आव्हान देण्याची आजपर्यंत कोणी हिंमत केलेली नाही. मुंबईत येऊन आज जे मराठी माणसावर दादागिरी करत आहेत त्यांनी सांगावं की, हा असला बाहेरच्यांचा कृतघ्नपणा त्यांच्या स्वतःच्या राज्यातील त्यांची तेथील लोपं खपवून घेतील का? इथे येऊन व्यवसाय करायचे आणि मराठी माणसाला फक्त ग्राहक अथवा नोकर या नजरेनेच बघायचे, ही मानसिकता चालवून घेता येण्यासारखी नाही. मानवतावादी उदारता, मोठेपणाच्या आहारी गेलेला इथला मराठी माणूस मात्र या अतिरेकाकडे दुर्लक्ष करत आला आणि तिथेच त्याच्याकडून चूक झाली असे आता म्हणायचे का?
जेव्हा भूमिपुत्र – मुंबईकर त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, तेव्हा त्याच्यावर प्रादेशिकतेचे आरोप करून त्याला राष्ट्रवादाची उदात्तता ऐकवली जाते. सर्वसमावेशकतेच्या आळवल्या जाणाऱ्या नरेटिव्हमध्ये तोच खलनायक ठरवला जातो. त्याला जागतिकीकरणाची व्याख्या समजावली जाते व ‘जग हे आता एक छोटेसे शहर, लहानसे कुटुंब झाले आहे’ यासारखे तत्त्वज्ञान ऐकवले जाते. मात्र या भूमिपुत्राची बाजू ऐकून, समजून घेण्यासाठी मात्र काहीच होत नाही! त्याने राष्ट्रवादासाठी आपला प्रदेशवाद गुंडाळून ठेवायचा, मग त्यात त्याच्या नैसर्गिक हक्कांची, अधिकारांची कत्तल झाली तरी चालेल. हे योग्य आहे का? न्याय्य आहे का? मराठी माणसाला हटवून आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न मराठी माणसाला कुठे नेऊन ठेवणार आहे? भाषेला अनुसरून व त्याच आधारावर आपल्या राष्ट्राची राज्य – प्रांत रचना झाली आहे. तेव्हा हा महाराष्ट्र आणि ही मुंबई निर्विवादपणे मराठी माणसाचीच आहे. म्हणूनच तर ती ‘आपली मुंबई – मराठी मुंबई’ आहे. इथे प्रथम, मराठी आणि नंतर इतर सर्व. इथे येणाऱ्या, राहणाऱ्या प्रत्येकाने ही साधी सोपी गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List