Walmik Karad surrender – गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी ते अण्णा! वाल्मीक कराडचा दहशत माजवणारा प्रवास
बीडमधील खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोप असलेला वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आला. पाषाण येथील सीआयडीच्या कार्यालयात त्याने आत्मसमर्पण केले. मागील काही दिवसांपासून सीआयडीची 13 वेगवेगळी पथके त्याच्या मागावर होती. एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे घरगडी म्हणून काम करणाऱ्या वाल्मीक कराड याचा वाल्मीक अण्णा होण्यापर्यंत प्रवास थक्क करणारा आहे.
साधारण सत्तर ते ऐंशीच्या दशकात बीड जिल्ह्यात केशरकाकू क्षीरसागर यांचा दरारा होता. बाबूराव आडसकरांचा हबाडा राज्यात प्रसिद्ध. शिवाजीराव पंडित, सुंदरराव सोळंके यांची जरबही चांगली. राजकारणातली ही पिढी अस्तंगत होत गेली. पुढे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व आले. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासोबत सर्वसामान्यांना असलेले महत्त्व कमी होत गेले आणि खुशमस्करे, चापलुस, कंत्राटदारांना महत्त्व आले. वाल्मीक कराड हा याच चापलुसांचा प्रतिनिधी! गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी म्हणून वाल्मीक कराडचा प्रवास सुरू झाला. दहशत, गुंडगिरीच्या जिवावर हा वाल्मीक एवढा मोठा झाला की, त्याच्यापुढे मुंडेही खुजे वाटू लागले. बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक कोण असावा, जिल्हाधिकारी कोण असावा हे ठरवण्यापर्यंत या वाल्मीकची मजल गेली.
वाल्मीक कराड हा परळी तालुक्यातील इंजेगावचा. घरी अठराविश्व दारिद्र्य. दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर 1990 मध्ये फुलचंद कराड यांच्या शिफारशीवरून वाल्मीक हा गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी म्हणून कामाला लागला. घरकाम करता करता त्याने महाविद्यालयीन शिक्षणही घेतले. साहेबांचा हा नोकर पुढे चार माणसांमध्ये वावरू लागला.
सुरुवातीच्या काळात वाल्मीक हा पंडितअण्णांसाठी हरकाम्या होता. पंडितअण्णांचा शब्द तळहातावर झेलता झेलता वाल्मीकने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. पण गोपीनाथ मुंडे यांनी त्याला चार हातांवरच ठेवले होते. परळीच्या राजकीय सारीपाटावरील खेळ बदलला. गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे मार्ग वेगळे झाले. वाल्मीक हा धनंजय मुंडे यांच्यासोबत गेला. 2001 मध्ये परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत गोपीनाथरावांचा विरोध झुगारून पंडितअण्णांनी वाल्मीकला उपनगराध्यक्ष केले. राजकारणाची ही त्याची पहिली पायरी.
गोपीनाथ मुंडे यांचा घरगडी म्हणून काम करणारा वाल्मीक सत्ता, पैसा आणि दहशतीच्या जोरावर कधी ‘अण्णा’ बनला हे बीडकरांना कळलेच नाही. धनंजय मुंडे यांचा सर्व कारभार वाल्मीकच्या हाती एकवटला. बीडचा जिल्हाधिकारी कोण असावा, पोलीस अधीक्षक कोण असावा, कोणत्या कंत्राटदाराला जवळ करायचे, कुणाला दूर करायचे याचे निर्णय वाल्मीकच घेत होता. परळीत साधा चपराशीही नेमायचा असेल तर सरकारकडून वाल्मीकला विचारले जात असे. एवढेच काय बीडमध्ये पोलिसांनी खिरापत वाटावी तसे वाटलेले बंदुकीचे परवानेही वाल्मीकच्याच इशाऱ्यावर दिले.
अमर्याद अधिकार मिळाल्याने वाल्मीक बेबंद झाला. मी म्हणजेच कायदा, मी म्हणजेच सरकार… परळीत ‘वाल्मीकराज’च सुरू झाले! वाल्मीकच्या प्रत्येक शब्दाला धनंजय मुंडे डोळे झाकून होकार देऊ लागले. वाल्मीकचा वावर संपूर्ण जिह्यात सुरू झाला. प्रतिस्पर्धी राजकारण्यांना तुच्छ लेखणे, त्यांची कामे अडवण्याचे प्रकार सुरू झाले. त्यातूनच गोपीनाथ मुंडे यांनी माणूस जोडण्याची मिळवलेली ख्यातीही धुळीला मिळाली.
गोपीनाथ मुंडेंचा विश्वास जिंकण्यासाठी…
परळीत गोपीनाथ मुंडे यांना विरोध करणारे काही क्षीण आवाज होते. टी. पी. मुंडे त्यापैकीच एक. वैजनाथ महाविद्यालयाच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे आणि टी.पी. मुंडे यांच्यात भयंकर वाद झाला. दंगलच झाली. पोलिसांनी झाडलेली गोळी वाल्मीकने आपल्या अंगावर झेलली… या गोळीने वाल्मीकला गोपीनाथ मुंडेंच्या निकटवर्तुळात प्रवेश मिळवून दिला. गोपीनाथ मुंडे यांच्या कृपेने त्याला थर्मलची कंत्राटे मिळत गेली. वारेमाप पैसा हाती खेळू लागला.
मुंडेंच्या राजकारणाची जरब बसवण्यासाठी वाल्मीकच्या शांत पण खुनशी स्वभावाचा अतिशय खुबीने वापर करण्यात आला. 2018 मध्ये मुंजा गीते प्रकरणात वाल्मीकचे नाव पहिल्यांदा आले. वाल्मीक नगरपालिकेत गटनेताही झाला. पुढे त्याला जिल्हा नियोजन समितीवरही घेण्यात आले. अलीकडेच ‘लाडकी बहीण’ योजनेचा विधानसभा प्रमुखही तोच झाला. पण या सगळ्या नियुक्त्या अतिशय गौण!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List