ठाण्यात नकली दारूचा ‘पूर’, दोन कोटींचा मुद्देमाल जप्त ; 395 जणांवर गुन्हे दाखल
नववर्ष स्वागत आणि थर्टी फर्स्टची सर्वत्र धूम पसरली आहे. पब, बार, रेस्टॉरंट आणि ढाब्यांवर तरुणाईसह मद्यपींची गर्दी चांगलीच वाढली आहे. मात्र मद्यप्राशन करणाऱ्यांनो सावधान ! कारण तुमच्या ग्लासात बनावट दारू असू शकते. ठाण्यात नकली दारूचा ‘पूर’ आला असून त्यात परदेशी, बनावट आणि बिना शुल्क दारूची विक्री केल्याचे उघड झाले आहे. या बनावट दारूचा पर्दाफाश करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी करत डिसेंबर महिन्यात तब्बल दोन कोटी रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे. याप्रकरणी 395 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
थर्टी फर्स्टच्या पाश्र्वभूमीवर दारूच्या बेकायदा वाहतुकीसह अमली पदार्थ उत्पादन, विक्री करणे, बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 395 गुन्हे दाखल करत दोन कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर कमी शुल्काची परदेशी दारू विक्री व साठा केल्याप्रकरणी तीन मोठे गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडून 67 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याशिवाय राज्य उत्पादन विभागाने चार फ्लाईंग स्कोडची नियुक्ती केली आहे. या स्कॉडने 14 विभागीय निरीक्षकांच्या मदतीने हातभट्टी, बेकायदेशीर ढाबे, हॉटेल आणि मद्यनिर्मितीच्या ठिकाणांवर कारवाई करून आतापर्यंत 2 हजार 592 गुन्हे नोंदवले आहेत. त्यांच्याकडून 11 कोटी 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली.
भांगेच्या गोळ्यांचा गोरख धंदा
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आयुर्वेदिक औषधाच्या नावाने भांगेच्या गोळ्यांची सर्रासपणे विक्री केली जात आहे. या गोळ्या पान टपऱ्या, लहान किराणामालाची दुकाने, काही औषधांची दुकाने आणि आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या बेकायदेशीर भांगेच्या गोळ्यांची विक्री व साठा केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.
डोंबिवलीत 170 तळीरामांवर कारवाई
डोंबिवली : ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह करणाऱ्या 170 तळीरामांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. थर्टी फर्स्टच्या पाश्र्वभूमीवर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कल्याण, डोंबिवलीतील सार्वजनिक रस्ते, मोकळ्या जागांवर दारू व अमली पदार्थांचे सेवन करणारे तसेच ढाब्यांमध्ये बेकायदेशीर मद्य विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. तसेच ठाकुर्ली 90 फुटी आणि कल्याण पूर्वेच्या 100 फुटी रस्त्यावर दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या तळीरामांवर कारवाई केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List