नववर्ष स्वागतासाठी ‘सिद्धिविनायक मंदिर’ सज्ज, पहाटे 3.15 वाजल्यापासून बाप्पाचे दर्शन खुले
मुंबईचे आराध्य दैवत असलेले प्रभादेवीचे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. अनेक मुंबईकर बाप्पाच्या दर्शनाने नवीन वर्षाचा ‘श्रीगणेशा’ करतात. त्यामुळे गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असल्याने मंदिर ट्रस्टने दर्शन रांगांचे विशेष नियोजन केले आहे. बुधवारी पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी बाप्पाचे दर्शन खुले होणार असून रात्री 10.30 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे.
नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक व्हावी, या भावनेने मुंबईकर वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरांना भेट देतात. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात मुंबई-ठाण्यासह दूरवरून भक्त येतात. त्यामुळे 1 जानेवारीला मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टने रांगांचे नियोजन जाहीर केले आहे. ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 1.30 ते 3 वाजता काकड आरती व महापूजा, पहाटे 5.30 ते 6 पर्यंत आरती, दुपारी 11.50 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत श्रींचा नैवेद्य, सायं. 6.50 ते 7 वाजता धुपारती, रात्री 7.30 ते 8 वाजेपर्यंत आरती होणार आहे. तसेच पहाटे 3.15 ते 5.15 वाजेपर्यंत, सकाळी 6 ते 11.50 वाजेपर्यंत, दुपारी 12.30 ते सायं. 6.50 वाजेपर्यंत, रात्रौ 8 ते 10.30 वाजेपर्यंत या वेळेत भक्तांना बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List