‘ते सभागृह नाही, सर्कस चालवत आहेत’, संजय राऊत यांची जगदीप धनखड यांच्यावर टीका
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाबाबत विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत, काँग्रेस खासदार जयराम रमेश, आरजेडी खासदार संजय झा आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. याच पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी जगदीप धनखड यांच्यावर टीका केली आहे. ते सभागृह नाही, सर्कस चालवत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, ”गेल्या 22 वर्षांपासून मी सभागृहात आहे. मी आतापर्यंत राज्यसभेचे चार सभापती पाहिले आहेत. यात व्यंकय्या नायडू, भैरवसिंह शेखावत, दोनवेळा हमीद अन्सारी होते. मात्र आता जी परिस्थिती मी पाहत आहे, ती याआधी मी कधीही पाहिली नाही. इतकी भयंकर परिस्थिती असूनही सभापती मजा घेत आहेत. ते सभागृह नाही, सर्कस चालवत आहेत. अशा प्रकारे सभागृह चालवलं गेलं, तर देशात संविधान राहणार नाहीच, लोकशाहीही राहणार नाही.”
राऊत म्हणाले की, ”राज्यसभेच्या सभापतिपदी बसलेले जे व्यक्ती आहेत, ते सभागृह सुरू होताच आगोदर 40 मिनिटे स्वतः भाषण करतात. स्वतःच संपूर्ण वेळ घेतात. नंतर जो शिल्लक वेळ असतो, ते समोरच्यांना (भाजप खासदारांना) दंगामस्ती करायला सांगतात. आम्ही हे सर्व हतबल होऊन पाहतो आणि बाहेर निघेऊन जातो (सभागृहातून). आपल्या संसदेचा मोठा इतिहास आहे, मात्र त्या इतिहासाला संपवण्याचं काम हे सभापती करत असून आमच्यासमोर अविश्वास प्रस्ताव आणण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. हा व्यक्तिगत लढा नसून हा लढा राज्यसभा वाचवण्यासाठी आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List