मुलाच्याच स्टायलिस्टला डेट करतेय 51 वर्षीय मलायका? चर्चांमागील सत्य समोर
अभिनेत्री मलायका अरोरा सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत होती. जवळपास चार-पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांचाही ब्रेकअप झाला. ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान अर्जुनने ‘सिंगल’ असल्याचं सर्वांसमोर जाहीर केलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच मलायका एका ‘मिस्ट्री मॅन’सोबत दिसली. हे दोघं मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर हातात हात घालून चालताना दिसले. यावरून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. प्रसिद्ध पंजाबी गायक ए. पी. ढिल्लनच्या कॉन्सर्टलाही दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. इतकंच नव्हे तर त्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर खास सेल्फीसुद्धा शेअर केला होता. मलायका आणि त्या मिस्ट्री मॅनच्या अफेअरच्या चर्चांमागचं सत्य आता समोर आलं आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, मलायकाच्या जवळच्या व्यक्तीने तिच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे. मलायका त्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बाब खोटी असल्याचं त्याने स्पष्ट केलंय. त्याचसोबत ती सिंगल असल्याचंही त्याने म्हटलंय. “तुम्ही आधी तथ्य पडताळून पाहा. मलायका सिंगल आणि खुश आहे. तिच्यासोबत दिसणारा मिस्ट्री मॅन हा राहुल विजय असून तो तिचा मुलगा अरहानचा स्टायलिस्ट आहे. म्हणूनच तो मलायकासोबत एखाद्या मित्राप्रमाणे वागत आहे. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा अत्यंत निराधार आहेत”, असं त्या व्यक्तीने सांगितलं आहे. त्यामुळे अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका सिंगल असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मलायकाने नुकतीच गायक ए. पी. ढिल्लनच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. या कॉन्सर्टमध्ये तिला राहुल विजयसोबत पाहिलं गेलं होतं. या कॉन्सर्टमध्ये मलायकाला स्टेजवरही आमंत्रित करण्यात आलं होतं. ए. पी. ढिल्लनने तिच्यासाठी खास गाणं म्हटलं आणि ती ‘बालपणीची क्रश’ असल्याचं सर्वांसमोर जाहीर केलं होतं. त्यानंतर दोघांनी स्टेजवर एकमेकांना मिठीसुद्धा मारली. यानंतर मलायकाने राहुल विजयसोबतचा सेल्फी शेअर केला. या दोघांच्या फोटोची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा झाली होती.
अर्जुन कपूरने ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान सिंगल असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही गमतीशीर पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यातलीच एक पोस्ट तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल होती. त्यात ‘रिलेशनशिपमध्ये, सिंगल आणि हेहेहेहे’ असे तीन पर्याय होते आणि त्यातील तिसऱ्या म्हणजेच ‘हेहेहेहे’ पर्यायावर बरोबरची खूण केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List