परभणीत माथेफिरूकडून संविधानाची विटंबना
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरूने आज सायंकाळी साडेपाच वाजता त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर शहरातील आंबेडकरी अनुयायी प्रचंड संतप्त झाले. मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमा झाले. प्रचंड घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर संतप्त अनुयायांनी उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली. तसेच परभणी रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेसदेखील रोखली. दरम्यान, संविधानाच्या प्रतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले. दत्ता सोपान पवार (42, रा. मिर्झापूर, ता.जि. परभणी) असे माथेफिरूचे नाव आहे.
आज संपूर्ण दिवसभर परभणी शहरामध्ये वेगवेगळी आंदोलने होती. सकल हिंदू समाजाच्यावतीने बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदूंवर अत्याचारांच्या विरोधात मोठा मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज परभणी बंद देखील ठेवण्यात आली होती. संपूर्ण बाजारपेठ बंद असल्यामुळे परभणी शहरात वर्दळ देखील कमी होती. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एक संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता माथेफिरूने त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली.
संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्याची बातमी परभणी शहरात वाऱ्यासारखी पसरली. हजारो आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दाखल झाले. तसेच पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर तेथे तैनात करण्यात आला. पण संतप्त झालेल्या आंबेडकरी तरुणांनी तिथे असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली, रास्ता रोको आंदोलन केले. नंतर परभणी रेल्वे स्टेशनवर जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस रोखून ठेवली होती. तब्बल अर्धा तास रेल रोको आंदोलन केल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने ते सोडवण्यात आले. मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस परभणी स्टेशनमधून रवाना झाली. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन परभणी पोलिसांनी आंदोलकांना दिले आहे. परभणी शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असून, संपूर्ण शहर कडकडीत बंद आहे. दरम्यान, संविधानाच्या प्रतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरामध्ये शांतता कायम राहावी यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हे जातीने लक्ष घालून सायंकाळी उशिरापर्यंत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर रस्ते सामसूम झाले. रस्त्यावर पोलीस मात्र पहारा देत होते. शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता.
अफवांवर विश्वास ठेवू नका जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची काच मंगळवारी सायंकाळी फोडल्याबद्दल पोलिसांनी एका माथेफिरूस ताब्यात घेतले असून, त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात कोणीही अफवा पसरवू नयेत, कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List