आमदार टिळेकर यांच्या मामाचे खून प्रकरण – सुपारी घेऊन गाडीतच केला खून; दोघे मारेकरी ताब्यात
खुनाची सुपारी घेऊनच मारेकऱ्यांनी भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण केल्यानंतर गाडीतच शस्त्राने भोसकून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघा मारेकऱ्यांना गुन्हे शाखेने वाघोली परिसरातून ताब्यात घेतले आहे. आरोपीपैकी एकजण सराईत असून त्याच्याविरुद्ध विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, खुनाला अनैतिक संबंधाची किनार असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. उर्वरित हल्लेखोरांसह मुख्य सूत्रधाराचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
पवन शर्मा (रा. धुळे) आणि नवनाथ गुरळ (रा. फुरसुंगी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. सतीश वाघ (58, रा. फुरसुंगी, सासवड रस्ता) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सतीश वाघ हे सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास फुरसुंगी परिसरात मॉर्निंग वॉक करीत होते. याची संपूर्ण माहिती हल्लेखोरांनी गोळा केली होती.
वाघ किती वाजता व्यायामासाठी घराबाहेर पडतात, त्यांच्यासोबत कोण कोण असते, परिसरात सीसीटीव्ही आहेत का नाही, अपहरणानंतर त्यांना कुठे न्यायचे, अपहरणासाठी विनाक्रमांक मोटार वापरण्याची पुरेपूर दक्षता घेत पाचजणांनी वाघ यांचे मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत मारेकऱ्यांनी गाडीतच त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. पोटात, पाठीत, गळ्याजवळ वार करीत मारेकऱ्यांनी त्यांचा खून केला.
आरोपींनी वाघ यांचा मृतदेह यवत गावाजवळील शिंदवणे घाटातील एका मोकळ्या जागेत टाकून दिला. त्यांनी अवघ्या पाऊण ते एक तासात आरोपींची मोटार पुन्हा पुण्यात परतताना सीसीटीव्हीत दिसून आली. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास शिंदवणे घाटात फिरण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना एकाचा मृतदेह दिसून आला. याची माहिती यवत पोलिसांना देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुणे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित मृतदेह वाघ यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
एका तपासासाठी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे ऑनफिल्ड होते. त्यानंतर 9 डिसेंबरला सकाळी साडेसहाच्या सुमारास अपहरण झाल्याची घटना घडल्यानंतर पुन्हा दोन्ही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला गती दिली. अखेर 10 डिसेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास एका आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List