पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राबद्दल गहना वशिष्ठचा मोठा खुलासा; तिने ऑफिसमध्ये जे पाहिलं…
अश्लील व्हिडीओ निर्मितीच्या आरोपांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठ हिची ईडीने सोमवारी सात तास चौकशी केली. त्यानंतर आजही (मंगळवार) तिला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत. ईडीने बजावलेल्या समन्सच्या पार्श्वभूमीवर गहना सोमवारी सकाळी ईडी कार्यालयात दाखल झाली. अश्लील व्हिडीओ निर्मितीच्या आरोपांप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रासह गहनाचं नाव पुढे आलं आहे. चौकशीदरम्यान गहनाने राज कुंद्राविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
तिने ऑफिसमध्ये जे पाहिलं…
चौकशीनंतर IANS ला दिलेल्या मुलाखतीत गहना म्हणाली, “मी नेहमी हेच सांगत आले आहे की मी कधीच राज कुंद्राशी थेट संवाद साधला नाही. उमेश कामतच्या माध्यमातूनच आमचा संवाद व्हायचा. पण मिटींगसाठी आम्ही ज्याठिकाणी भेटायचो, त्याच्या प्रवेशद्वारावर ‘वियान इंडस्ट्रीज’ असं नाव लिहिलेलं होतं. त्याचप्रमाणे आम्हाला तिथे राज कुंद्राच्या कुटुंबाचाही फोटो पहायला मिळाला. त्यामुळे ते ऑफिस राज कुंद्राचं असावं असा माझा अंदाज आहे. अन्यथा कोणी अशाप्रकारे राज कुंद्राच्या कुटुंबाचा फोटो ऑफिसमध्ये का लावेल?”
याविषयी ती पुढे म्हणाली, “हॉटशॉट्स हे नोव्हेंबर 2020 मध्येच बंद झालं होतं. मी जानेवारी 2021 मध्ये पहिल्यांदा राज कुंद्राला भेटले होते. तेव्हा राज बॉलिफेम आणि जल्दीलाइफ हे दोन ॲप लाँच करणार होता. आमची भेटसुद्धा त्याचसंदर्भात झाली होती. शिल्पा शेट्टी त्याची ब्रँड ॲम्बेसेडर होणार होती.”
गहनाच्या घरावर ईडीचे छापे
एका चित्रपटासाठी तीन लाख रुपये मिळाल्याची माहितीही गहनाने यावेळी दिली. गेल्या आठवड्यात गहनाच्या घरावर ईडीने छापे टाकले होते. त्यावेळी तिचे दोन फोन आणि इतर कागदपत्रं जप्त करण्यात आली होती. तसंच तिची सात बँक खातीही गोठवण्यात आली होती. अश्लील व्हिडीओ निर्मितीच्या आरोपांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी राज कुंद्रालाही ईडीने दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र दोन्ही वेळेला तो ईडीसमोर उपस्थित राहिला नाही.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या प्रकरणात ईडीने राज कुंद्राची चौकशी केली होती. अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी राजला मुंबई पोलिसांनी जुलै 2021 मध्ये अटकसुद्धा केली होती. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप आहे. तयार केलेला अश्लील चित्रपटांचा कंटेंट ‘हॉट हिट मुव्हीज’ आणि ‘हॉटशॉट्स’ या सबस्क्रिप्शन आधारित मोबाइल ॲप्सवर वितरित केला जात होता. ‘हॉटशॉट्स’ हे ॲप कुंद्राने 2019 मध्ये स्थापन केलेल्या आर्मस्प्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे विकसित केला गेल्याचा आरोप होता. आर्मस्प्राईमने नंतर कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षीच्या मालकीच्या युके स्थित केनरिन लिमिटेड कंपनीला हॉटशॉट्स विकलं. या प्रकरणाशी संबंधित कुंद्रा आणि अन्य तीन आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांनी याआधीच चार्जशीट दाखल केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List