साऊथ सुपरस्टार मोहन बाबू यांची गुंडगिरी; टीव्ही 9 च्या पत्रकारावरच केला जोरदार हल्ला
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मोहन बाबू यांचा कौटुंबिक वाद एकीकडे चव्हाट्यावर असताना दुसरीकडे त्यांनी पत्रकारावर हल्ला केला आहे. मुलासोबत झालेल्या वादाबद्दल प्रश्न विचारताच त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी रिपोर्टरचा माइक हिसकावून त्यानेच हल्ला केला. यामुळे संबंधित पत्रकाराच्या डोक्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी ही घटना घडली. मुलगा मंचू मनोज याच्यासोबत संपत्तीवरून सुरू असलेल्या वादादरम्यान आता पत्रकारावर हात उचलून मोहन बाबू यांनी आपली अडचण अधिक वाढवली आहे.
पत्रकारावर हल्ला
मोहन बाबू यांनी टीव्ही 9 च्या पत्रकारावर हल्ला केला असून त्यात त्या पत्रकाराच्या चेहऱ्याचं हाड मोडल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी संबंधित पत्रकाराने एफआयआर दाखल केली आहे. मोहन बाबू यांचा वाद आधी फक्त कुटुंबापुरताच मर्यादित होता. पण आता त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या मीडियाशी गैरवर्तन केलं आहे. मुलाबद्दल प्रश्न विचारतात त्यांनी आपला संयम गमावला आणि पत्रकारावर थेट हल्ला केला.
कौटुंबिक वाद
मोहन बाबू यांचा मुलगा मंचू मनोज हा जलपल्ली इथल्या घरी गेला होता. आपल्या मुलीला भेटू दिलं जात नसल्याचं सांगत मनोजने मीडियाला आपल्यासोबत घेतलं होतं. त्यावेळी मनोजला घरात जाऊ दिलं नाही. सुरक्षारक्षकांनी घराचे गेट बंद केले. त्यानंतर मनोजचाही संयम सुटला. त्याने गेट तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. याच प्रकरणी प्रश्न विचारल्यानंतर मोहन बाबू यांनी मीडियावर जोरदार हल्ला चढवला.
प्रतिनिधीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत
या घटनेत टीव्ही 9 चे प्रतिनिधी रंजित हे दुखापतग्रस्त झाले. मोहन बाबू यांनी मागे वळून न पाहताच टीव्ही 9 चा माइक पकडला आणि त्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. ते पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेले होते. फक्त प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर आपण हात उगारतोय याची त्यांना जराही जाणीव झाली नव्हती. या हल्ल्यात टीव्ही 9 आणि टीव्ही 5 चे प्रतिनिधी दुखापतग्रस्त झाले आहेत. या प्रकारामुळे प्रसारमाध्यमांमध्ये नाराजी आहे. याप्रकरणी मोहन बाबू यांनी माफी मागावी, अशी मागणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केली आहे.
पत्रकारांचा ठिय्या
मोहन बाबू यांच्या कृतीनंतर मीडियाच्या प्रतिनिधींचा संताप वाढला आणि त्यांनी थेट त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं. पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याबद्दल मोहन बाबू यांनी तात्काळ माफी मागावी आणि त्यावेळी केवळ बघ्याची भूमिका करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई व्हावी, अशी माहणी मीडियाच्या प्रतिनिधींनी केली आहे. मोहन बाबू यांच्या हल्ल्यात टीव्ही 9 चा रिपोर्टर रंजित गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोळ्याला आणि कानाला दुखापत झाली आहे. रंजितला उपचारासाठी शमशाबाद रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रंजितची जाइगोमॅटिक हाडं तीन ठिकाणी मोडल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. पत्रकाराच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List