विरोधी पक्षनेतेपदासाठी सदस्य संख्येची अडचण नाही – पटोले
विरोधी पक्षनेते पदासाठी सदस्यसंख्येची काहीच अडचण नाही. विरोधी पक्षनेता व विधानसभा उपाध्यक्ष पद विरोधी पक्षातील महाविकास आघाडीला देण्यात आले पाहिजे, सरकार त्याबाबतील सकारात्मक असून हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदाची निवड होईल, अशी अपेक्षा आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज म्हणाले.
नाना पटोले यांनी आज विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीला मिळणार का, असे माध्यमांनी त्यांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, महाराष्ट्र विधिमंडळाला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. अनेकदा काँग्रेसकडे मोठे बहुमत असतानाही विरोधी पक्षांची सदस्य संख्या किती आहे हे न पाहता विरोधी पक्षनेते पद दिले होते. हीच परंपरा लक्षात घेऊन विधानसभेचा विरोधी पक्षनेता व विधानसभेचा उपाध्यक्ष विरोधी पक्षांचा असावा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडली आहे, असे पटोले म्हणाले.
महायुतीचे सरकार लाडक्या भावासाठी काम करणार
‘लाडकी बहीण’ योजनेमुळेच पुन्हा सत्तेत आलो, असे महायुतीचे नेते सांगत आहेत. पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडक्या बहिणीचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे, असा हल्ला पटोले यांनी सरकारवर केला. महायुतीचे सरकार हे ‘लाडक्या भावा’ साठी काम करणारे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List