सामना अग्रलेख – गर्दी कायम! माघारीचा दिवस संपला
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी हजारो बेरोजगारांचे अर्ज आले. त्याआधी लाखांनी आपापल्या पक्ष कार्यालयात मुलाखती दिल्या. यातून मग जे ‘फेल’ ठरले ते नाराज, बंडखोर, झुंडखोर रिंगणात उरतात. त्यातले काहीजण सच्चे असतात, पण बंडखोरांच्या कोलाहलात सच्चेपण हरवून जाते. तरीही माघारीचा दिवस शांततेत पार पडला. आता रिंगणातल्या पहेलवानांचे भविष्य जनता ठरवेल!
आपल्याकडील निवडणुकांत नेहमीच बंडोबांचे अमाप पीक येत असते. तसे ते या निवडणुकीतही आलेच आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 7 हजार 905 उमेदवारांचे 10 हजार 900 अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या शेवटच्या दिवशी हजारभर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. याचा अर्थ बंडोबा थंडोबा झाले असे नाही. 288 जागांसाठी अजूनही उमेदवारांची प्रचंड गर्दी कायम आहे. अपक्ष, छोटे पक्ष, जिल्हा स्तरावरील आघाडय़ा व त्यातही नाराजांनी भरलेले अर्ज कायम आहेत. मनोज जरांगे यांनीही आधी निवडणुका लढण्याचे व काहींना पाडण्याचे ‘प्लॅन’ जाहीर केले, पण शेवटी त्यांनी निवडणूक न लढलेल्याच बऱ्या असे ठरवले. नाहीतर त्यांचेही उमेदवार मैदानात असते. एकंदरीत महाराष्ट्रात दोन प्रमुख आघाडय़ा व इतर भाराभर उमेदवार मैदानात आहेत. मैदानातील या गर्दीने लोकशाही चेंगरून कोसळणार नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे. दिवाळीचे फटाके फुटत असताना महाराष्ट्रात ठिकठिकाणी सर्वपक्षीय बंडखोरीचे फटाके फुटले. भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासारख्यांनी ‘बंड’ केल्याचा आव आणून उमेदवारी अर्ज भरल्याचा ‘ताव’ मारला, पण फडणवीसांनी ‘ईडी’चा डाव लावताच गोपाळरावांचा आव आणि ताव आणि भाव कोसळला व त्यांनी माघार घेतली. या काळात नाराजांना व बंडखोरांना कोणी काय गाजरे दाखवली असतील बरे? माघार घेण्यासाठी ज्या मनधरण्या केल्या असतील व
त्यातील कित्येकांना
त्या-त्या पक्षांच्या नेत्यांनी ‘विधान परिषदा’ महामंडळांची आश्वासने दिली असतील, याची गणती नाही. शेकडो जणांना ‘तुला या वेळी विधान परिषदेत पाठवतोच. आता माघार घे!’ या एका आश्वासनावर अनेकांनी माघार घेतली. या हिशेबात राज्य विधान परिषदेतील आमदारांचा आकडा 500 वर करावा लागेल व हजारावर महामंडळे निर्माण करावी लागतील. लोकशाही ही आता निवडणुकांपुरती उरली आहे व निवडणूक सामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही. लोकांच्या नावाने सर्वांनी सर्वकाळ चालवलेली सर्वमान्य राष्ट्रीय बनवेगिरी म्हणजे आपल्याकडील निवडणुका. हे बनवाबनवीचे चित्र निर्माण करणारे आपले राजकारणी लोकशाही व निवडणुका किती गांभीर्याने घेतात हेच या ‘बनवेगिरी’तून दिसते. लोकशाही ही कायद्याच्या पुस्तकात किंवा न्यायालयात जन्मत नसते, तर लोकांच्या इच्छेतून फुलत असते. पण जनतेच्या इच्छा सरळ पायदळी तुडवल्या जात आहेत. जनतेच्या इच्छेवर पैशांचा, आमिषांचा मारा होतो व शेवटी लोकशाहीचे सगळेच मुसळ केरात जात असते. विश्वासघातातून बनलेली सरकारे पोलीस यंत्रणांचा वापर करून निवडणुकांत धाकदपटशाचा मार्ग स्वीकारताना दिसतात व निवडणूक आयोग मूकदर्शक बनून स्वस्थ बसतो. भारतीय निवडणुकांतील ढोंगबाजी व गैरप्रकार याबद्दल निवडणूक आयोग गंभीर नाही. आजचे सरकार तर याविषयी कधीच गंभीर नव्हते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंड येथे सांगितले, ‘काही झाले तरी समान नागरी कायदा आणणारच!’ गृहमंत्र्यांना आमचे सांगणे आहे, निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना आधी कायद्याने वागायला सांगा. आहे तो कायदा तुम्हाला पेलवत नाही,
पाळता येत नाही
व निघालेत समान नागरी कायद्याचे शिवधनुष्य पेलायला! महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांना बेकायदेशीरपणे बसवले व त्यांच्या हातात निवडणुकांची सूत्रे फडणवीस वगैरे लोकांनी दिली. यावर विरोधकांनी वारंवार आवाज उठवल्यावर काल निवडणूक आयोगाने फडणवीसांच्या लाडक्या ताईसाहेबांना पदावरून दूर केले. कोणत्याही लोकशाहीत निवडणुकांचे अनन्यसाधारण महत्त्व असते व त्यावर देखरेख व नियंत्रण हे निष्पक्ष व सक्षम यंत्रणेकडूनच व्हायला हवे. आपल्या देशात अशा निष्पक्ष यंत्रणा आज टिकवल्या आहेत काय? निवडणुकाच निष्पक्ष पद्धतीने पार पाडल्या जात नसतील तर इतर संस्थांचे काय घेऊन बसलात? निवडणुका हा एक गरमागरम बाजार झाला आहे. विषाला उकळी फुटावी तशी प्रत्येकाच्या विचाराला उकळी फुटत असते. त्यात ना देशहित ना महाराष्ट्रहित. निवडणुका लढवायच्या या ईर्ष्येने लोक रिंगणात उतरतात. विचार वगैरे गेले खड्डय़ात. उमेदवारांचे काय घेऊन बसलात? इथे तर घाऊक पद्धतीने पक्षांतरे, बंडखोऱ्या सुरू असतात. उमेदवारांची भाऊगर्दी म्हणजे एखाद्या नोकरभरतीत दोनशे शिपायांच्या जागांसाठी लाखभर बेकारांचे अर्ज यावेत व भरतीच्या ठिकाणी किंवा मुलाखतीच्या वेळी प्रचंड रेटारेटी व्हावी तसाच हा प्रकार. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी हजारो बेरोजगारांचे अर्ज आले. त्याआधी लाखांनी आपापल्या पक्ष कार्यालयात मुलाखती दिल्या. यातून मग जे ‘फेल’ ठरले ते नाराज, बंडखोर, झुंडखोर रिंगणात उरतात. त्यातले काहीजण सच्चे असतात, पण बंडखोरांच्या कोलाहलात सच्चेपण हरवून जाते. तरीही माघारीचा दिवस शांततेत पार पडला. आता रिंगणातल्या पहेलवानांचे भविष्य जनता ठरवेल!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List