Sharad Pawar interview : मविआत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? शरद पवारांचं मोठं वक्तव्य
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शरद पवार यांची मुलाखत टीव्ही ९ मराठीवर प्रसारीत झाली आहे. ‘टीव्ही ९ मराठीचे’ मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी अनेक खुलासे केले आहेत. राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट की काँग्रेसचा? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत विचारण्यात आललेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर दिलं.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
गेल्यावेळी जेव्हा राज्यात प्रथमच महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं, दरम्यान या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देण्यात आलेला नाही. ज्याच्या सर्वात जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र ठरल्याची चर्चा आहे, याबाबत बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की,’स्ट्राईक रेट काय आहे? लोकसभेत दहा जागा लढवल्या, आठ जिंकल्या. जागा किती लढवल्या हे महत्त्वाचं नाही. किती निवडून येतील हे महत्त्वाचं आहे. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी चेहऱ्याची गरज होती. ते मत व्यक्त केलं. आता परिस्थिती वेगळी आहे, निकाल लागू द्या. जागा किती येतात ते पाहू द्या. सरकार येऊ द्या, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे., या योजनेवर बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार टोला लगावला. ‘लाडकी बहीण म्हणजे सरकारी तिजोरीतून पैसे देणे. काही राज्यात पैसे मतांसाठी वाटतात. इथे दुसरं काय केलं. नाव गोंडस दिलं. पैसे सरकारी तिजोरीतून काढले आणि वाटप केले, मात्र लोक अशा गोष्टींना भुलनार नाहीत, त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभा निवडणुकीत दिसेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List