अमित ठाकरे यांची ताकद दुप्पट, अखेरच्या क्षणी माहीममधून मोठा पाठिंबा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचं आव्हान असणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानाला अवघे 5 दिवस शिल्लक असताना माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना एका मोठ्या संघटनेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या संघटनेच्या पाठिंब्यामुळे अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा अमित ठाकरे यांना माहीम विधानसभेतून जाहीर पाठिंबा देण्यात आल्याची माहिती मनसे अधिकृत या फेसबुक पेजवरुन देण्यात आली आहे. “मुंबई-ठाणे परिसरात राज्यभरातून बंजारा समाज नोकरी, मजुरी आणि व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर राहत आहे. मुंबईमधील माहिम विधानसभेत बंजारा समाजाची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. गोरगरीब लोकांसाठी असणारी आपुलकी आणि त्यांच्या अडचणींमध्ये धावत जाऊन त्यांना मदत करण्याच्या मनसेच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. म्हणूनच आम्ही अमित ठाकरे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत” , असे राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या मेनका राठोड यांनी अमित ठाकरे यांची भेट घेत भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रीय बंजारा परिषद ही सर्वात मोठी संघटना
गोरबंजारा समाजामध्ये राष्ट्रीय बंजारा परिषद ही सर्वात मोठी संघटना असून या संघटनेमार्फत समाजातील धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. गोरबंजारा समाजातील सर्व तांडे धर्मपीठाशी राष्ट्रीय बंजारा परिषदमुळे जोडले गेले आहेत. तांडा स्तरावरील नायक, कारभारी, पुजारी आणि गोरबंजारा समाजाचे, तांडा समिती नायकण, महिला समिती, युवा धर्म रक्षक, गोरबंजारा, धर्मपीठाचे पदाधिकारी, पालखीचे पदाधिकारी हे सर्वजण राष्ट्रीय बंजारा परिषदेशी निगडीत असल्याने राष्ट्रीय बंजारा परिषद यांनी दिलेल्या जाहीर पाठिंबामुळे मनसेच्या विजयी मताधिक्यात नक्कीच वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, मनसेला या निवडणुकीत खूप अपेक्षा आहे. या निवडणुकीत मनसेचे जास्त आमदार निवडून आले तर त्यांची भाजपसोबत युती होणार असल्याचे संकेत खुद्द राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय-काय राजकीय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List