नेरळमध्ये मेणबत्तीच्या उजेडात प्रसूती
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सोयी सुविधांची अक्षरशः वानवा असून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने मेणबत्तीच्या उजेडात प्रसूती करावी लागत असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर रुग्णांना अनेकदा पिण्यासाठी पाणीदेखील मिळत नाही. स्वच्छतेचेही बारा वाजले आहेत. याची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेने प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची झाडाझडती घेतली.
दैनिक ‘सामना’ वृत्तपत्रात 22 ऑक्टोबर रोजी आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या बातमीनंतर शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ व ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ. प्रशांत भुईंबर, रायगड जिल्हा समन्वयक परेश देशमुख यांच्या आदेशाने नेरळ येथील कर्जत भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भेट देण्यात आली. आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा पाणीपुरवठा नाही, स्वच्छतेचे बारा वाजले आहेत, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसून डॉक्टर व औषधांचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले. या भागातील शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असून त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने गंभीर बाब समोर आली. याप्रकरणी कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन गुरव यांना निवेदन देण्यात आले.
तत्काळ समस्यांचे निराकरण करा
रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सर्व समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी शिव आरोग्य सेनेच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी शिव आरोग्य सेनेचे खोपोली शहर समन्वयक सचिन पाटील, विलास पाटील, आरोग्य संघटक शांताराम मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक अझीम शेख आदी उपस्थित होते
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List