आम्ही फोडाफोडी करणार नाही; पण करेक्ट कार्यक्रम करणार – सतेज पाटील
राज्यात सत्ताबदल करताना सुरत, गुवाहटीला नेऊन आमदार फोडण्याच्या झालेल्या प्रकाराप्रमाणे कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यांना आज फोडण्यात आले. त्यावरून महायुतीच्या नेत्यांना त्यांच्या विजयाची खात्री नसल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पण आम्ही अशी फोडाफोडी करणार नाही; तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांनी महायुतीला दिला.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना जीवाचे रान करून काँग्रेसमधून विजयी केले. आज एका रात्रीत असे काय परिवर्तन झाले की, त्यांना मुंबईत जाऊन शिंदे गटात प्रवेश करावा लागला. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना खास विमान पाठवावे लागले. त्यांच्यावर काय दबाव आहे, हे आता त्याच सांगतील. अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचा, दबावतंत्राचा प्रयत्न कोल्हापूरकर कधीही सहन करत नसल्याचेही सतेज पाटील यांनी सांगितले.
जयश्री जाधव यांनी उमेदवारी मागितली होती. त्यांची इच्छा होती. आपण वस्तुस्थिती समजविल्यानंतर त्यांनी मान्य केले होते. त्यांच्याकडे नाराजी नव्हती. किमान त्यांनी जाताना काही अडचण असेल तर आपल्याशी बोलायला पाहिजे होते. शिंदे गटात जाण्याचे त्यांचे आजचे कृत्य जाधव कुटुंबाला शोभणारे नाही. त्यांनी घेतलेला निर्णय क्लेषदायी आहे, याची खंत वाटते; पण कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार असल्याचा ठोस विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जे या पक्ष प्रवेशासाठी घेऊन गेले, त्यांना जिंकण्याची खात्री नसल्याने हा प्रवेश करून घेतल्याचा टोलाही सतेज पाटील यांनी मिंधे गटाचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना लगावला. क्षीरसागर यांना स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्याचा विश्वास नसल्याचे सांगतानाच, कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही, असा इशाराही सतेज पाटील यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांना दीप दिवाळी घरातच साजरी करावी लागेल
z महायुतीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, त्यानंतर आम्ही दीप दिवाळी साजरी करणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, मुख्यमंत्र्यांना दीप दिवाळी घरातच साजरी करावी लागेल. कारण महाराष्ट्रातील जनता आमच्यासोबत आहे, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे वाढलेल्या महागाईने जनतेची दिवाळी कडू झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List