सूरज चव्हाणच्या आयुष्यातील खरा ‘बिग बॉस’ कोण?; अंकिताच्या व्हीडिओनंतर चाहत्यांना प्रश्न
घरात कुणीही उच्च शिक्षित नसताना, सिनेसृष्ठीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना बारामतीचा सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोचा विजेता ठरला. त्याचा साधेपणा प्रेक्षकांना भावला. प्रेक्षकांनी त्याला भरघोस मतं देत रिअॅलिटी शोचा विजेता केलं. ‘बिग बॉस मराठी’ संपल्यानंतर ‘बिग बॉस’मधील सदस्यांनी सूरजच्या घरी जात त्याची भेट घेतली. कोकण हार्टेड गर्ल- अंकिता प्रभू वालावलकर हिनेही सूरज चव्हाणच्या बारामतीतील घरी जात त्याची भेट घेतली. त्यानंतर अंकिताने काही फोटो आणि व्हीडिओ पोस्ट केले. त्यानंतर एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
अंकिता- सूरजची भेट
बारामतीतील मोढवे गावात जात अंकिताने सूरजची भेट घेतली. या भेटीचे फोटो अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंचं तिने सूरजच्या अकाऊंटसोबतदेखील कोलॅब्रेशन केलं. मात्र नंतर काही तासांनी हे कोलॅब्रेशन सूरजच्या अकाऊंटवरून हटवण्यात आलं. ही बाब एका चाहत्याने अंकिताच्या लक्षात आणून दिली. मग थँक यू, तुम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिली. पण एक शेवटचं सांगते सूरज त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट हँडल करत नाही. सूरजच्या आजूबाजूला त्यांना मी नको असल्या कारणास्तव मी ह्यातून काढता पाय घेत आहे. यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात, धन्यवाद, असं अंकिता वालावलकर म्हणाली. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.
अंकिता काय म्हणाली?
अंकिताने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. यातून तिने काही मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. सूरज खूप भोळा आहे आणि त्याच्या आजूबाजूचे लोक या भोळेपणाचा फायदा घेत आहेत. तो गणपतीच्या मूर्तीच्या मातीसारखा आहे. त्याला जसा आकार द्याल तसा तो घडेल. तो स्वत:चं मत मांडत नाही. त्याच्या आजूबाजूचे लोक चुकीच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत. कारण ते त्यांच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत. त्याला मोबाईल दुसऱ्या व्यक्तीकडे असतो, तिसरी व्यक्ती त्यावर व्हीडीओ एडिट करत असते, असं अंकिताने म्हटलं आहे.
सूरजचा खरा ‘बिग बॉस’ कोण?
अंकिता वालवलकरने हा व्हीडिओ शेअर केल्यानंतर आता सूरजबद्दल सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळतेय. सूरज चव्हाणच्या आयुष्यातील खरा ‘बिग बॉस’ कोण? त्याचं इन्स्टग्राम अकाऊंट, त्याचा सोशल मीडिया कोण हँडल करतं? त्याच्या साधेपणाचा फायदा नेमकं कोण घेत आहे? असा सवाल नेटकरी सोशल मीडियावर विचारत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List