दिलीप वळसे, हसन मुश्रीफ यांनाही अटक होणार होती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपसोबत गेले नसून, ‘ईडी’च्या कारवाईपासून वाचण्यासाठी सत्तेत जाऊन बसले आहेत. अटकेची कारवाई टाळण्यासाठी नेतेमंडळी भाजपसोबत गेले आहेत. सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनाही अटक होणार होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज केला.
भोसरीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी पवार पिंपरी- चिंचवड शहरात आले होते. पवार म्हणाले, ‘मंत्री छगन भुजबळ यांनी ‘ईडी’ पासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेल्याची सत्य कबुली दिली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी अजित पवारांचा गट भाजपसोबत गेला नाही. ‘ईडी’ कारवाईपासून वाचण्यासाठी सत्तेत जाऊन बसले आहेत.
तोडफोड, दबावतंत्राच्या राजकारणामागील आधुनिक काळातील अनाजी पंत कोण, हे लोकांना कळले आहे. दडपशाही, गुंडगिरी, पैशांचा वापर ही प्रवृत्ती लोक धुडकावून लावतील. मंत्री दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांनाही अटक होणार होती. अनेक नेते अटकेची कारवाई टाळण्यासाठी भाजपसोबत गेले आहेत. आम्ही मराठी माणसे म्हणून लढत आहोत. दिल्लीसमोर झुकलो नाही. काही लोक झुकले आहेत. महाविकास आघाडीचे 170 ते 180 आमदार निवडून येतील’, असेही रोहित पवार म्हणाले.
भाजपने सत्तेसाठी कुटुंब फोडले
सुनेत्रा पवार यांना अटक होईल, या भीतीने अजित पवार भाजपसोबत गेले असल्याच्या भुजबळ यांच्या विधानाबाबत विचारले असता, ते म्हणाले की, ‘अजित पवार यांच्या घरच्या लोकांना अडचणीत आणण्यासाठी भविष्यात तुरुंगवास झाला असता, असे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचे कळते आहे. भाजप सत्तेत येण्यासाठी आणि कुटुंब फोडण्यासाठी काहीही करू शकते. भाजपची वृत्ती आणि प्रवृत्ती कोणत्याही थराला जाऊ शकते’, असेही रोहित पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List