भारतीय निर्मातीने विकत घेतलं Friends फेम मॅथ्यू पेरीचं घर; हिंदू पद्धतीनुसार केली पूजा
‘फ्रेंड्स’ या सर्वांत लोकप्रिय सिटकॉममध्ये चँडलर बिंगची भूमिका साकारणारा अभिनेता मॅथ्यू पेरी याचं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झालं. त्याच्या निधनाच्या वृत्ताने जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ऑक्टोबर महिन्यात तो त्याच्या राहत्या घरातील स्विमिंग पूलमध्ये बेशुद्धावस्थेत आढळला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. ज्या घरात मॅथ्यूचं निधन झालं, ते घर आता एका भारतीय वंशाच्या रिअल इस्टेट डेव्हलपर आणि चित्रपट निर्मातीने विकत घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिता वर्मा-लालियनने मॅथ्यूचं घर 8.55 दशलक्ष डॉलर म्हणजेच 72.04 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. घर विकत घेतल्यानंतर तिने हिंदू पद्धतीनुसार खास पूजा केली. या पुजेचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
घरातील स्विमिंग पूलजवळच अनिताने ही पूजा केली आहे. पुजेचे फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, ‘या महिन्यात आम्ही लॉस एंजिलिसमधील हे घर विकत घेतलं आहे. या घरात प्रवेश करताच, मला ही जागा प्रचंड आवडली. खासकरून घरातून दिसणाऱ्या पॅसिफिक महासागराच्या दृश्याच्या मी प्रेमात पडली आहे. आम्ही लगेचच हे घर विकत घेण्याचा निर्णय घेतला’, असं तिने म्हटलंय. मॅथ्यू पेरीच्या घरातील काही गोष्टी बदलणार नसल्याचंही तिने स्पष्ट केलंय. ‘या घराच्या जुन्या मालकाच्या काही सकारात्मक गोष्टी आम्ही तशाच ठेवणार आहोत. त्या व्यक्तीने आपल्या प्रतिभिने अनेकांच्या आयुष्यात हास्य आणलं होतं. हे घर विकत घेण्याच्या निर्णयाचा जुन्या मालकाशी काहीच संबंध नाही. आम्हाला हे घर आवडलं, म्हणून या वास्तूच्या प्रेमापोटी आम्ही ते विकत घेतलंय. आम्ही त्यातील काही डिझाइन्स तसेच ठेवणार आहोत. पूलमधील बॅटमॅनचा लोगो तसाच राहणार आहे. हे घर म्हणजे आमच्यासाठी परफेक्ट व्हेकेशन होम असेल. इथे नव्या आठवणी बनवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत’, असं तिने पुढे लिहिलंय.
मॅथ्यू पेरीने 2020 मध्ये हे घर 6 दशलक्ष डॉलर म्हणजेच 50.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. 3500 चौरस फूटांवर पसरलेल्या या बंगल्यात त्याने बऱ्याच गोष्टी आपल्या आवडीनुसार बदलल्या होत्या. त्यापैकीच एक बदल म्हणजे त्याने हॉट टबला जोडून स्विमिंग पूल बांधून घेतला होता. याच स्विमिंग पूलमध्ये तो बेशुद्धावस्थेत आढळला होता. या घरात चार बेडरुम, चार बाथरुम्स, लिव्हिंग रुम, डायनिंग रुम आणि किचनचा समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List