सत्ता आल्यावर लाडक्या बहिणींचे पैसे वाढवणार; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हती. लोकसभेला तुम्ही दणका दिलात आणि बहीण लाडकी झाली. आम्ही बहिणी फार स्वाभिमानी आहोत. मोडू, पण पैशासमोर वाकणार नाही. सत्ता आल्यावर लाडक्या बहिणींचे पैसे वाढवू. त्याबरोबर सुरक्षादेखील केली जाईल, असे वक्तव्य शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. शिरोळ येथील सभेत त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला काँग्रेससोबत कधीच अंतर वाटत नव्हते. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात होणार आहे. मला मिळालं काय आणि बंटीदादाला मिळालं काय, एकच होणार आहे. मात्र बहिणीचं नातं महाराष्ट्रातल्या नेत्याला कळलं नाही याचं दुःख आहे. यांनी 1500 रुपये किंमत आमच्या नात्याला लावली. माझ्या नावावर एकही साखर कारखाना नाही. पवारसाहेबांनी जे साखर कारखाने काढले, त्याची मालकी स्वतःकडे कधीही घेतली नाही. प्रेमाने मागितलं असतं तर प्रेमाने सगळे देऊन टाकले असते. मात्र बहिणींचे नाते हेच तर त्यांना कळले नाही, असा टोला सुप्रिया यांनी लगावला.
आबांची आठवण
शिरोळ भागात आले की आर. आर. आबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आर. आर. पाटील संकटात संपूर्ण महाराष्ट्राच्या पाठीशी उभे होते. ते (अजित पवार) विसरले असतील, पण मी विसरलेले नाही. मात्र परवा आबांच्याबद्दल जे भाषण झाले, त्याचे अत्यंत दुःख झाले आहे. मी सुमनवहिनींना फोन करून माफी मागितली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List