तीनही मतदारसंघांत महाविकास आघाडी एकसंध; अजित गव्हाणे-महेश लांडगे यांच्यात ‘काँटे की टक्कर’
भोसरी मतदारसंघातून रवी लांडगे आणि पिंपरीतून माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघात एकसंध, एकदिलाने निवडणूक लढविणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्यक्त केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघात सात उमेदवारांनी माघार घेतल्याने 11 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अपक्ष उमेदवार रवी लांडगे यांनी माघार घेतली आहे. महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता गव्हाणे आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात ‘काँटे की टक्कर’ होणार आहे.
भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे, भाजपचे महेश लांडगे यांच्यासह बलराज कटके, अमजद खान, जावेद शहा, अरुण पवार, खुदबुद्दीन होबळे, गोविंद चुनचुने, हरिश डोळस, रफीक कुरेशी, शलाका कोंडावार हे निवडणूक रिंगणात आहेत. तर, रवी लांडगे, परमेश्वर बुर्ले, रामा ठोके, सूरज गायकवाड, दत्तात्रय जगताप, बापूसाहेब वाघमारे, संतोष लांडगे या सातजणांनी माघार घेतली आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस या घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकत्यांनी रविवारी पिंपरीत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीनंतर तीनही पक्षातील नेत्यांनी संयुक्तिक पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सुलभा उबाळे, तुषार कामठे, रवी लांडगे, केसरीनाथ पाटील, तुषार साने, महाविकास आघाडीतील भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे, चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे, पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत उपस्थित होते.
“रवी लांडगे यांच्या पाठिंब्यामुळे भोसरी मतदारसंघांमध्ये निश्चितच महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे. लांडगे यांच्यामागे तरुणांचे वलय आहे. तरुणांची शक्ती, शिवसेनेची ताकद आणि त्यांचा पाठिंबा यातून विजय नक्कीच सोपा होणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यात आपल्या विचारांचे सरकार आणायचे आहे. भोसरी मतदारसंघातील गेल्या दहा वर्षांत निर्माण झालेला विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे.
अजित गव्हाणे, उमेदवार, महाविकास आघाडी
भोसरी मतदारसंघाचा विकास हे एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही दोघे निवडणुकीच्या रणांगणात उभे आहोत. मात्र, मतांचे विभाजन होऊ नये, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यातून दगा फटका होऊ नये असा विचार करून पक्षश्रेष्ठींनी सांगितलेल्या सूचनेनुसार माघार घेतली आहे. महाविकास आघाडी म्हणून अजित गव्हाणे यांचे काम करणार आहे.
रवी लांडगे, माजी नगरसेवक (शिवसेना)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List