उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची चर्चा; महाविकास आघाडी एकजुटीने विधानसभा लढणार
बंडखोरांचे मन वळवण्यात महाविकास आघाडीला मोठय़ा प्रमाणात यश आले. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. उद्धव ठाकरे आज दुपारी सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहचले. तिथे या दोन्ही नेत्यांत महत्त्वाची चर्चा झाली. तिथूनच बंडखोरांना पह्न गेले आणि अपक्ष अर्ज भरणाऱया अनेक उमेदवारांनी माघार घेतली. बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला व जे बंडखोर माघार घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. महाविकास आघाडी एकजुटीने विधानसभा निवडणूक लढणार, असेही त्यांनी नमूद केले.
बंडखोर उमेदवारांबाबत आज उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत उपस्थित होते. काही ठिकाणी विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपल्या स्तरावर प्रयत्न केले आहेत. तसेच महाविकास आघाडीकडून मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देण्यात आल्या आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तर बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादीनेही प्रयत्न केल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. मैत्रीपूर्ण लढती नको अशी आमची भूमिका होती. त्यामुळेच बंडखोरांनी माघार घ्यावी म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही तिन्ही पक्षांनी प्रयत्न केले.
उद्धव ठाकरे,शिवसेना पक्षप्रमुख
जरांगेंच्या निर्णयामुळे आनंद – शरद पवार
जरांगेंचा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय योग्य असून याबद्दल आपल्याला आनंद झाल्याचे ते म्हणाले. कारण जरांगे सतत सांगत आले आहेत की, भाजप हाच आमचा विरोधक आहे. त्यांनी उमेदवार दिले असते तर भाजपला फायदा झाला असता. त्यामुळेच जरांगेंचा निर्णय योग्य वाटतो, असे शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीसह मित्रपक्षांशी चर्चा – संजय राऊत
विधानसभा निवडणूक एकत्रित लढवावी अशीच महाविकास आघाडीची भूमिका आहे. मात्र काही ठिकाणी समाजवादी, कम्युनिस्ट किंवा शेतकरी कामगार पक्षाकडून अर्ज भरण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी संबंधितांशी चर्चा केल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List