BLOG : समजलं नाही सरवणकर, राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर तुम्ही कसं ऐकलं असतं?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. आज 4 तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंतची वेळ होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरलेला असताना माहीममध्ये नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. माहीम विधानसभेकडे सगळ्या राज्याच लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे मैदानात आहे. माहीमची निवडणूक ही बिग फाईट आहेच, पण आता ही निवडणूक जास्त प्रतिष्ठेची बनली आहे. कारण माहीमध्ये शेवटच्या अर्ध्यातासात नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. माहिमध्ये तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालय. सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी सदा सरवणकरांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरु होते.
स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकरांशी चर्चा केली. भाजपाने सुद्धा अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची इच्छा बोलून दाखवली. सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न सुद्धा झाले. पण सरवणकर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. महायुतीला या माध्यमातून लोकसभेला मनसेने दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करायची होती. सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घेतल्यास त्यांना विधान परिषदेवर पाठवलं जाईल, अशी सुद्धा चर्चा होती. पण आता माहीममध्ये शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर, उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि मनसेचे अमित ठाकरे असा तिंरगी सामना होणार आहे.
‘राज ठाकरे सांगतिल ते ऐकण्याच्या मनस्थितीत होतो’
उमेदवारी अर्ज मागे घेण्याला काही वेळ उरलेला असताना सदा सरवणकर यांनी मीडियाशी संवाद साधला. “माझा मुलगा समाधान सरवणकर आणि चार पदाधिकारी राज ठाकरे यांनी भेटण्यासाठी गेले होते. पण त्यांनी भेट नाकारली. ते म्हणाले, मला काही बोलायचं नाही. निवडणूक लढवायची असेल, तर लढवा. भेट नाकारली, त्यामुळे माझ्यासारख्याने काय केलं पाहिजे. भेट मिळणार नसेल, तर उमेदवार म्हणून निर्णय घ्यावा लागेल. राज ठाकरे सांगतिल ते ऐकण्याच्या मनस्थितीत होतो” असं सदा सरवणकर म्हणाले.
शेवटच्या क्षणी राज ठाकरे यांना का भेटायचं होतं?
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही मिनिटं आधी सदा सरवणकर यांनी जी काही स्टेटमेंट केलीत, त्यामुळे काही प्रश्न निर्माण झालेत. मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते इतक्या दिवसापासून सांगत होते, तरी सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. मग, शेवटच्या क्षणी राज ठाकरे यांना भेटून ते उमेदवारी कसे मागे घेणार होते?. शिवाय उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना राज ठाकरे यांना का भेटायचं होतं?. त्याआधी का भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही? या सगळ्यातून स्वत:च्या निवडणूक लढण्याच समर्थन आणि सहानुभूती मिळवण्याची एक खेळी दिसून येते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List