’23 तारखेला अॅटम बॉम्ब फुटणार’, एकनाथ शिंदे यांचं प्रचाराचा नारळ फोडताच मोठं भाकीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुर्ल्यातून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडला. शिवसेनेचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचाराची पहिली सभा घेत एकनाथ शिंदे यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मंगेश कुडाळकर हे शंभर टक्के निवडून येतील असा दावा केला. तसेच येत्या 23 नोव्हेंबरला अॅटम बॉम्ब फुटणार, असं भाकीत एकनाथ शिंदे यांनी केलं. राज्यात येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या दिवशी महायुतीच्या सर्वाधिक जागा जिंकून येणार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून केला. “ही मुंबईतील पहिली प्रचारसभा आहे. त्याचा मान आपल्या कुर्ला विधानसभा मतदारसंघाला मिळाला आहे. मंगेश कुडाळकर हे ओपनिंग बॅट्समन झाले आहेत. आता तुम्हाला या मॅचमध्ये चौकार आणि षटकार मारायचा आहे. मारणार ना? बाकी लोकांना क्लिन बोल्ड, डिपॉझिट गुल करायचं आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“इतक्या मोठ्या संख्येने सर्वजण उपस्थित आहेत, एवढे प्रचारासाठी रस्त्यावर उतरले तर समोरच्याचा डिपॉझिट जप्त होणार. सगळ्यांचं डिपॉझिट जप्त होईल ना? की डाऊट आहे? कारण मंगेश कुडाळकर मागच्या वेळी 24 हजार मतांनी निवडून आले. आता तुम्हाला त्यांना 50 हजार मतांनी जिंकवायचं आहे. मंगेश कुडाळकर यांचा विजय पक्का आहे. त्यांचा मी आधीच अभिनंदन करतोय. फटाके फुटत आहेत. दिवाळी आहे. काही ठिकाणी लवंगी फटाके आहेत. पण आपला 23 तारखेला अॅटम बॉम्ब फुटणार”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. “म्हणूनच मी एका विश्वासाने तुमच्या मतदारसंघात सुरुवात केलेली आहे”, असंदेखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची लाडक्या बहिणींना खुशखबर
“महायुतीच्या सभा होतील. आजही महायुतीची आपली प्रचारसभा आहे. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील. ही दिवाळी सर्वांना आनंदाची जावो, अशा शुभेच्छा देतो. खास करुन माझ्या लाडक्या बहिणींना आज भाऊबिजेच्या शुभेच्छा देतो. आता तुम्हाला फक्त वर्षाला भाऊबीज मिळणार नाही, तर दर महिन्याला भाऊबीज मिळेल. आपल्याला दर महिन्याला माहेरचा आहेर मिळणार”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
“किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले त्यांनी हात वर करा. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्या देखील खात्यात पैसे जमा होतील, हे वचन देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आम्ही देणारे लोक आहोत. विरोधी पक्षाचे लोकं लाडकी बहीण योजना बंद होईल, ही योजना बंद होईल, काय भीक देतात का, महिलांना विकत घेता का? असं बोलणाऱ्या विरोधकांना तुम्ही काय उत्तर देणार? खोडा टाकणाऱ्यांना जोडाल दाखवणार की नाही? ते लोक कोर्टातही गेले. पण मुंबई हायकोर्टाने त्यांना एक लाफा मारला”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List