कोल्हापुरात साडेपंधरा लाखांची रोकड जप्त; शिये-बावडा तपासणी नाक्यावर कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू असताना, शिये-बावडा तपासणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाने रेडिअंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस लि. पुणे या कंपनीच्या पिकअप वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये 15 लाख 61 हजार 857 रुपये इतकी रक्कम आढळली. या रकमेबाबत संबंधितांकडे कोणतेही पुरावे आढळून न आल्याने ही रक्कम जप्त करून, कोषागार कार्यालयात सिलंबद पेटीत ठेवण्यात आल्याची माहिती कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार (करमणूक) सैपन नदाफ यांनी दिली आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून कसबा बावडामार्गे कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱया मार्गावर शिये-बावडा रस्ता, छत्रपती राजाराम कारखान्यासमोरील तपासणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकांकडून काल दिवसभरात 2 हजार 533 वाहनांची तपासणी करण्यात आली. क्र.2 चे पथकप्रमुख पोपट साधू वाडेकर व त्यांच्या पथकाने यातील एमएच 46 बीएम 4297 या रेडिअंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस लि. पुणेच्या पिकअप वाहनाची तपासणी केली असता, यामध्ये ही रक्कम आढळून आली. या रकमेबाबत संबंधितांकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे ही रक्कम जप्त करून कोषागार कार्यालयात सिलबंद पेटीत ठेवण्यात आली आहे. हे प्रकरण पुढील तपासणीसाठी आयकर विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती नदाफ यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List