कोपरी-पाचपाखाडीत मिंध्यांकडून साड्या वाटप, ठाण्यात आचारसंहिता खुंटीला टांगली
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा आचारसंहिता भंग केल्याचे दिसत असतानाही निवडणूक यंत्रणा डोळ्यांवर कातडी ओढून गप्प बसली असतानाच आज मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात महिलांना खुलेआम साडय़ांचे वाटप केले. काही महिलांना साडय़ा वाटल्या तर काही महिलांना रात्री उशिरा त्या वाटल्या जाणार होत्या. संत ज्ञानेश्वर नगरात एका गोदामात भरून ठेवलेल्या साडय़ांचा साठा बहाद्दर शिवसैनिकांनी पकडून दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि निवडणूक अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. आता यावर या यंत्रणा काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संत ज्ञानेश्वर नगर प्रभाग क्रमांक 13 मध्ये मिंधे गटाकडून महिलांना साडय़ा वाटप करण्यात आल्या. एका गोदामात भरून ठेवलेल्या साडय़ा रात्री उशिरा घरोघरी वाटण्यात येणार आहेत. याची खबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱयांनी या गोदामावरच धाड घातली. यावेळी तेथे साडय़ांचा ढीग व ‘लाडक्या बहिणीला भाऊबीज भेट’ असा मजकूर असलेल्या पिशव्या सापडल्या. याचा व्हिडीओ शिवसेनेचे विभागप्रमुख अशोक जाधव यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने ठाणे शहरात प्रचंड खळबळ उडाली. त्यानंतर पोलीस व निवडणूक आयोगाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
गोडाऊन सील करा, मुद्देमाल जप्त करा!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांना कोपरी-पाचपाखाडीतून मोठा पाठिंबा मिळत असल्याने गद्दार गटाच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी आपल्या मर्जीतील महिलांना साडय़ा वाटप करून खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्या आमिषांना मतदार भुलणार नाहीत असे सांगतानाच गोडाऊन सील करा आणि मुद्देमाल जप्त करा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List