शिवसेनाप्रमुखांचा उद्या महानिर्वाण दिन, शिवतीर्थावर शक्तिपूजा
शिवतीर्थावर उद्या शक्तिपूजा होणार आहे. ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता अंगार आणि अखंड हिंदुस्थानचे लाडके नेते, हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या 17 नोव्हेंबर रोजी महानिर्वाण दिन असून या दिवशी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी दादरच्या शिवतीर्थावरील शक्तिस्थळावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक आणि सामान्य जनता हजारोंच्या संख्येने दाखल होणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. पालिकेची यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनात ज्वलंत हिंदुत्वाचे स्फुलिंग चेतवले. मुंबई-महाराष्ट्रात मराठी माणसाला स्वाभिमानाने, ताठ मानेने जगण्याचा मंत्र दिला. शिवसेनाप्रमुखांनी देव, देश आणि धर्मासाठी झोकून देणाऱया पिढय़ा निर्माण केल्या. लाखो, करोडो लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ऊर्मी निर्माण केली. अशा तेजस्वी आणि शिवतेज असलेल्या उत्तुंग नेत्याचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाले. अवघा देश हळहळला. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्वाण दिनी केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून जनता दरवर्षी त्यांना वंदन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने येत असते.
दिलदार माणूस, कणखर नेता, सिद्धहस्त व्यंगचित्रकार, साक्षेपी संपादक…
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वात दूरदृष्टी लाभलेले कणखर नेतृत्व, अद्वितीय प्रभावशाली वक्ता, सिद्धहस्त व्यंगचित्रकार, साक्षेपी संपादक, दिलदार माणूस आणि प्रभावी वक्ता असे अनेक पैलू होते. निष्ठावंतांवर त्यांनी नेहमीच प्रेम केले, मात्र गद्दारांना चांगलीच धडकी भरवली. आजही त्यांचे विचार नव्या पिढीला रोमांचीत करतात. प्रेरणादायी ठरतात. अन्यायाविरोधात पेटून उठण्यासाठी अंगात अंगार पेटवतात. त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्वाण दिनी हजारो शिवसैनिक, शिवसेनाप्रेमींची शक्तिस्थळावर येऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी रिघ लागते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List