मोदी आणि शहा महाराष्ट्राच्या विकासातील अडथळे, संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे शत्रू असून महाराष्ट्राच्या विकासातील अडथळे आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. चांदिवली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार मोहम्मद आरिफ नसीम खान यांच्या प्रचारार्थ परेरावाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्धार जनतेने केला असून 23 नोव्हेंबरला यांची काय दशा होते ते पहाच असेही ते म्हणाले.
योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन म्हणतात बटेंगे तो कटेंगे आणि मोदी म्हणतात एक रहोगे तो सेफ रहोगे. पण, तुमचे या महाराष्ट्रात काहीच चालणार नाही. कारण, येथील जनतेला विकास हवाय. मारण्याची आणि कापण्याची भाषा उत्तर प्रदेश आणि दिल्लीत जाऊन करा, असे संजय राऊत म्हणाले. लाडक्या बहिणींना दीड हजार देऊन आणि पाठ थोपटून घेऊन त्या जोरावर त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. परंतु, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये देऊ, तसेच त्या बसमधून मोफत प्रवासही करू शकतील. त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल, असेही संजय राऊत म्हणाले. दरम्यान, नसीम खान यांनी जात-पात न मानता प्रचंड काम केले आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. तर ही निवडणूक राज्यातील थांबलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी होत आहे. निवडून आल्यानंतर या मतदारसंघातील चौफेर विकासासाठी प्रचंड मेहनत घईन, असे आश्वासन नसीम खान यांनी दिले.
राज्यघटनेने दिलेले अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही!
हिंदुस्थानातील लोक हे जिवंत समाजघटक आहेत. त्यांना कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. लोकांना हिंदुस्थानी राज्यघटनेने जे अधिकार दिले आहेत ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मात्र, स्वतःचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदीने संघर्ष करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पवन खेरा यांनी केले. यावेळी नसीम खान यांना मोठय़ा मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. चांदिवली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांच्या प्रचाराच्या सभेला काँग्रेसचे नेते-प्रवक्ते पवन खेरा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List