धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय होणार
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना होत आहे. तीन टर्म आमदार असलेले प्रताप सरनाईक सत्ता आणि पैशांसाठी आईसमान असणाऱ्या शिवसेनेशी गद्दारी करून ‘मिंधे’ झाले. त्यांची ही गद्दारी येथील मतदार विसरले नसून याचा जोरदार तडाखा त्यांना बसण्याची शक्यता आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश मणेरा यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने ‘चौकार’ ठोकण्याच्या तयारीत असलेले सरनाईक ‘क्लिन बोल्ड’ होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक 5 लाख 45 हजार 110 मतदार संख्या असलेल्या ओवळा – माजिवडा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. घोडबंदर रोड येथे नव्याने उदयाला येणाऱ्या उच्च मध्यमवर्गीयांची वस्ती ते थेट मीरा भाईंदरपर्यंत या मतदारसंघाच दुसरे टोक आहे. बहुभाषिक असलेल्या या मतदारसंघात आगरी समाजातील मतदारांची संख्यादेखील लक्षणीय आहे. येथून शिवसेनेच्या तिकिटावर प्रताप सरनाईक तीन वेळा आमदार झाले आहेत. मात्र स्वतःचा आर्थिक विकास करण्यापलीकडे हवी तशी ठोस कामे त्यांनी केलेली नाहीत. घोडबंदर परिसरात एकीकडे गगनचुंबी इमारती उभ्या राहात असताना या ठिकाणी पाणी, चांगले रस्ते, वाहतूककोंडी, कचऱ्याचा गंभीर प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही. त्यातच शिवसेनेशी गद्दारी करून मिंधेवासी झाल्याने मतदारांचा त्यांच्यावर रोष आहे. तर दुसरीकडे स्वच्छ प्रतिमेचे आणि दांडगा जनसंपर्क असलेले शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार नरेश मणेरा यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने यावेळी येथे विजयाची मशालच धगधगेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सुरत गाठणाऱ्यांना कायमचे घरी बसावे लागणार
या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने सरनाईक यांचा प्रत्येक निवडणुकीत विजय झाला आहे. मात्र तपास यंत्रणेला घाबरून शिवसेनेशी गद्दारी करून याच मार्गाने सुरत गाठणाऱ्या सरनाईक यांना आता कायमचे घरी बसावे लागेल अशी चर्चा सुरू आहे.
ईडीला घाबरून पळालेल्यांना तडाखा बसणार
शिवसेनेचे उमेदवार नरेश मणेरा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीने झंझावाती प्रचार सुरू केला आहे. निष्ठावंत शिवसैनिकाला थेट विधानसभा निवडणुकीची संधी दिल्याने जल्लोषाचे वातावरण आहे. मणेरा हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या कारकीर्दीपासून शिवसेनेत आहेत. या मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना पाहायला मिळणार आहे. एकीकडे ईडीच्या भीतीने शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या सरनाईक यांना या निवडणुकीत जनता नक्की धडा शिकवेल, असा विश्वास मणेरा यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List