निष्क्रिय आमदाराला घरचा रस्ता दाखवणार; शिवसेनेच्या घाटाळांचे पारडे जड
ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गद्दारीला गाडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह महाविकास आघाडीमधील सर्व घटकपक्ष सज्ज झाले आहेत. विविध समस्येने त्रस्त झालेल्या जनतेला या मतदारसंघात बदल हवा असल्याने महाविकास आघाडीचे महादेव घाटाळ यांचे पारडे जड आहे.
मतदारसंघात प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून त्यांना गद्दारी चांगलीच भोवणार आहे.
भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील भिवंडी वाडा हा रस्ता कळीचा मुद्दा ठरणार असून या रस्त्याने प्रवास करणारा प्रत्येक जण त्रस्त आहे. अशीच परिस्थिती अंजुरफाटा खारबाव – कामण – चिंचोटी या रस्त्याची झाली आहे. या मतदारसंघात ‘हर घर जल हर घर नल’ या योजनेंतर्गत तब्बल तेराशे कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. परंतु या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार श्रमजीवी संघटनेसह भाजपने केली आहे. भिवंडी ग्रामीण मतदारसंघात आजही आरोग्य सेवा मिळू शकलेल्या नाहीत. या सर्वांचा जाब गावागावात निष्क्रिय आमदार शांताराम यांना विचारला जात असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. त्यातच भाजप समर्थक अपक्ष उमेदवार स्नेहा पाटील निवडणूक रिंगणात आहेत. वरिष्ठांच्या दबावानंतर त्यांनी प्रचार थांबवला. परंतु त्यांची नाराजी महायुतीला चांगलीच भोवणार असल्याची चर्चा आहे. शांताराम मोरे यांनी काहीच विकासकामे न केल्याने खारबाव, राहनाळ, अनगाव, अंबाडी भाजप कार्यकर्ते त्यांच्या प्रचारापासून लांब आहेत.
खोक्यांचा हिशेब द्यावा लागणार
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागासह वाडा तालुक्यातील वाडा नगरपंचायत व 68 मतदान केंद्रांचा सहभाग या मतदारसंघात होतो. सुरुवातीपासून हा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला आहे. शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेऊन शांताराम मोरे यांना दोनदा आमदार केले. मात्र ‘खोक्यां’ साठी शिवसेनेशी गद्दारी करून ते मिंधेवासी झाले. त्यामुळे शांताराम मोरेंच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड संताप आहे. गद्दारीला गाडण्यासाठी शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
रस्त्यावरची लढाई लढणारा कार्यकर्ता
भिवंडी ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीचे महादेव घाटाळ यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली असून जिल्हाप्रमुख विश्वास थळे, खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह महाविकास आघाडीमधील सर्व पदाधिकारी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आदिवासी समाजाच्या प्रश्नांसह सर्व घटकांसाठी नेहमीच रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी तयार असलेले महादेव घाटाळ यांना सर्व ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List