रोहित-विराटची मायदेशातील शेवटची कसोटी? आता मायदेशातील कसोटी मालिका थेट ऑक्टोबर 2025 ला
वानखेडेवर खेळला जाणारा कसोटी सामना हा रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांचा मायदेशातला अखेरचा कसोटी सामना तर नाही ना? हे ऐकून प्रत्येक हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमीला धक्का बसेल. त्यांचा सध्याचा एपंदर कसोटी खेळ पाहून कुणीही हे मान्य करेल की हे दोघे आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती पत्करतील. फक्त त्यांचा फॉर्मचा त्यांना कसोटी संघातील स्थान कायम ठेवण्यास मदत करू शकतो.
रोहित आणि विराट हे दोघे आणखी काही वर्षे हिंदुस्थानी संघासाठी कसोटी खेळावेत, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची मनापासून इच्छा आहे. पण अपयशी फलंदाजांना कुणीही फार काळ संघात खेळवू शकत नाही. या कसोटीनंतर हिंदुस्थानी संघ थेट वर्षानंतरच वेस्ट इंडीजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेपर्यंत खेळण्यासाठी रोहित आणि विराटला आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आपल्या फलंदाजीची जादू दाखवावीच लागेल. या मालिकेनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना 11 ते 15 जूनला लॉर्डस्वर खेळला जाणार आहे. जर हिंदुस्थानी संघ अंतिम फेरीत पोहोचला तर या सामन्यात हे दोघेही खेळतील आणि हिंदुस्थानला कसोटी क्रिकेटचे जगज्जेतेपद जिंकून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीनंतर एक गोष्ट निश्चित आहे. जर हिंदुस्थान जगज्जेता ठरला तर रोहित आणि विराट सन्मानाने कसोटी क्रिकेटला अलविदा करतील. जर हिंदुस्थानला अपयश मिळाले तर त्यांचा निवृत्तीचा निर्णय तेव्हाच्या कामगिरीवर अवलंबून असेल. या मालिकेनंतर थेट ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थानी संघ मायदेशात पहिली मालिका खेळणार आहे. त्या मालिकेपर्यंत पोहोचण्यासाठी या दोघांना आपला फॉर्म कायम राखणे, सध्यातरी कठीण वाटतेय.
विराट कोहली मागे पडतोय…
पाच वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरच्या धावांचा आणि शतकांचा विश्वविक्रम मोडण्याची क्षमता असलेला विराट कोहली आता या शर्यतीत खूप मागे पडला आहे. त्याचे कसोटीतील अपयश आता फार काळ लपणार नाही आणि लपवले जाणारही नाही. गेल्या पाच वर्षांत त्याच्या बॅटमधून केवळ दोनच शतके निघाली आहेत. गेली पाच वर्षे तो फक्त आपल्या पूर्वपुण्याईवर खेळतोय. आता त्याच्या पुण्याईचा खेळ संपत चालला आहे. आता केवळ त्याची बॅटच त्याला वाचवू शकते. रोहितच्या बाबतीतही सारे असेच घडतेय. तोसुद्धा फक्त कर्णधार असल्यामुळे संघात आहे.
या दोघांचे अपयश त्यांना फार काळ संघात ठेवू शकणार नाही, हे सत्य आहे. हे आपल्याला कबूल करावेच लागणार.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List