विमानात बॉम्बची अफवा पसरवल्याप्रकरणी अटक केलेल्या अल्पवयीन आरोपीसोबत दुष्कृत्य
मुंबई विमानतळावर तीन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी छत्तीसगडमधील 17 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर या मुलाला मुंबई पोलिसांनी बालसुधारगृहात ठेवले होते. मात्र या मुलावर बालसुधारगृहात लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. एका अल्पवयीन कैद्याने बालसुधारगृहाच्या बाथरुममध्ये त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगा इयत्ता 11 वीत शिकत होता. मुंबई विमानतळावरील तीन आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी सहार पोलिसांनी त्याला अटक केली होती. गेल्या आठवड्यात त्याला बालसुधारगृहात आणण्यात आले होते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा त्याच्या बॅरेकमधील बाथरुममध्ये गेला असताना 16 वर्षीय कैद्याने त्याच्यावर हल्ला केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बालसुधारगृहातील अधिकाऱ्यांनी डोंगरी पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर 16 वर्षीय मुलाविरुद्ध मुलांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम 4, 8, आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List